टी20 विश्वचषक 2024 मध्ये सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपत आहे. त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह सूर्यानं विराट कोहलीच्या एका मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यासह त्यानं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध सूर्यकुमार यादवनं अवघ्या 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 53 धावा केल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीमुळे भारतानं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 181 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा संघ 134 धावांवरच गारद झाला. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहनं 3-3 बळी घेतले.
सूर्यकुमार यादवला त्याच्या या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय टी20 मधील हा त्याचा 15 वा सामनावीर पुरस्कार होता. यासह सूर्यानं विराट कोहलीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीनं देखील टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये 15 वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. मात्र विराट आणि सूर्यामधील मोठा फरक म्हणजे, विराट कोहलीनं 121 सामन्यांमध्ये 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तर सूर्यानं केवळ 64 सामन्यांमध्येच ही कामगिरी केली!
जर सूर्यकुमार यादव आणखी एका सामन्यात सामनावीर ठरला, तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनेल. सध्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. सूर्यकुमार यादवनं या टी20 विश्वचषकात 4 सामन्यांमध्ये 112 धावा केल्या आहेत. तो रिषभ पंतनंतर (116) भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हाताला काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या?