टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अगदी आधी सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये (Suryakumar Yadav) परतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत ‘स्काय’ची बॅट जोरदार तळपली आहे. सूर्याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांत अर्धशतके ठोकली आहेत. आता पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातही भारतीय कर्णधाराकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा असेल. यादरम्यान सूर्याकडे विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी असेल.
भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोनच फलंदाजांनी 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. ते दोन फलंदाज म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. आता या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत बसण्याची संधी सूर्यकुमार यादवला मिळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात सूर्याने जर 33 धावा केल्या, तर तो हा टप्पा गाठणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरेल. सूर्याने आतापर्यंत 103 सामन्यांत 164 च्या स्ट्राईक रेटने 2967 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघाला मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 बाद 215 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 165 धावांवर गारद झाला. मात्र, पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया 3-1 ने पुढे असून, भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे.






