मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव मागील काही वर्षापासून जबरदस्त फलंदाजी करत आला होता. असे असूनही, त्याला भारतीय संघामध्ये सामील होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. आयपीएल २०२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची निवड झाली नव्हती. त्यानंतर, सूर्यकुमारने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि आपल्या तंदुरुस्तीवरही काम केले. इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याची भारतीय संघात निवड झाली.
सुर्यकुमारने जागवल्या आठवणी
अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी२० सामन्यात सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसर्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवची संघात निवड झाली नव्हती. मात्र, त्यानंतर चौथ्या सामन्यात त्याने पदार्पणात दमदार फलंदाजी केली आणि ३७ चेंडूत ५१ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या स्टुडिओमध्ये सूर्यकुमारने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर मारलेल्या षटकाराच्या आठवणी जागवल्या.
“मला हे आधीच माहित होते”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामोरे गेलेल्या आपल्या पहिल्या चेंडूविषयी बोलताना तो म्हणाला, “जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर मारलेल्या षटकारांबद्दल लोक नेहमी मला विचारतात. त्यावेळी मला शांत राहणे आवश्यक होते आणि मला माहित होते की आर्चरने आयपीएलमध्ये काय केले होते आणि फलंदाजांवर तो कशाप्रकारे वर्चस्व गाजवतो. तो नव्या फलंदाजाला कसा चेंडू टाकणार? हे मला आधीच माहीत होते. मला पक्के ठाऊक होते की, तो नवख्या फलंदाजाला आखूड टप्प्याचे चेंडू फेकेल. त्याने नेमके हेच केले. त्याऐवजी आर्चरने वेगळा चेंडू टाकला असता तर काय झाले असते, हे मी सांगू शकत नाही. मात्र, सर्व काही चांगले घडत गेले याबाबत मी आनंदी आहे.”
सूर्यकुमारने आतापर्यंत भारतासाठी केवळ दोन टी२० सामने खेळले आहेत. मात्र, आयपीएलचा तो एक मान्यवर खेळाडू मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
त्या ट्विटमुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूची कारकीर्द धोक्यात? बोर्ड कारवाई करण्याची शक्यता
जेव्हा विराटला पत्नी अनुष्का म्हणाली होती, ए कोहली चौका मार ना.., व्हिडिओ होतोय व्हायरल
वाढदिवस विशेष: कारकिर्दीत अनेक वादळे येऊनही नरीन आपली मिस्ट्री टिकवून आहे