भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. टीम इंडियानं अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतानं आयर्लंड आणि पाकिस्तानचा पराभव केला होता. या विजयानंतर भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे.
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अमेरिकेनं 20 षटकांत 8 गडी गमावून 110 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतानं 18.2 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठलं. भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा आणि रिषभ पंत लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र येथून सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी डावाची धुरा सांभाळत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं 49 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. तर शिवम दुबेनं 35 चेंडूत 31 धावांचे योगदान दिलं.
सूर्यकुमार यादवचं फॉर्ममध्ये परतणं ही भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सूर्यकुमार गेल्या काही सामन्यांपासून फार्मशी झगडत होता. मात्र अमेरिकेविरुद्धचं त्याचं अर्धशतक भारतीय चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये सूर्याचा फॉर्म संमिश्र राहिला होता. तसेच तो टी20 विश्वचषकात आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरला होता.
आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाला 15 जूनला कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. यानंतर 24 जूनला भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. जर भारताला हा टी20 विश्वचषक जिंकायचा असेल, तर सूर्यकुमार यादवचं फॉर्ममध्ये असणं खूप गरजेचं आहे. सूर्याकडे कोणत्याही परिस्थितीतून एकहाती सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्पर्धेच्या मोक्याची क्षणी त्यानं धावा करणं, ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे.
सध्या भारतीय संघ ‘अ’ गटात 3 सामन्यांत 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतानं पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. यानंतर पाकिस्तानचा 6 धावांनी तर अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे टीम इंडियानं विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, रोहित शर्मानं सौरव गांगुलीला टाकलं मागे!
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या
अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास! हार्दिक पांड्यालाही फायदा, शाकीब अल हसनचं नुकसान