कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा धक्का बसला आहे. केकेआरच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत 200 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला होता, तरीही संघाला पराभव पत्करावा लागला. यावरून संघाची गोलंदाजी यंदा बरीच कमकुवत असल्याचे दिसून येत आहे.
संघाला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे, तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाच्या (Matheesha Patheerana) निवडीबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. पथिराना कधी संघात सामील होणार, यावर संघाचे असिस्टंट कोच शेन वॉटसन यांनी माहिती दिली आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना वॉटसन म्हणाले, आम्ही श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या उत्तराची वाट पाहत आहोत. पथिरानाने लवकरात लवकर संघात सामील व्हावे यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला वाटते की त्याने इथेच राहावे, कारण केकेआरकडे उत्तम सपोर्ट स्टाफ आणि मेडिकल टीम आहे. मात्र, तो पूर्णपणे फिट झाल्याशिवाय आम्ही त्याला मैदानात उतरवण्याची घाई करणार नाही.






