---Advertisement---

स्वामी विवेकानंद संघाला १६ वर्षांखालील गटाचे जेतेपद

On: शनिवार, मार्च 14, 2020 10:00 AM
---Advertisement---

मुंबई। स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या गटाचे जेतेपद पटकावले. प्रणय कपाडियाच्या दमदार खेळीच्या जोरावर त्यांनी आयईएस न्यू इंग्लिश स्कूल संघावर ८८ धावांनी विजय मिळवला.

मुंबई टप्प्यातील अन्य लढतीत १४ वर्षांखालील मुले गटात रिझवी स्प्रिंगफिल्ड अंतिम फेरीत प्रवेश केला, तर १६ वर्षांखालील मुलींच्या गटात शारदाश्रम विद्यामंदिर विरुद्ध सेंट कोलुम्बा यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे.

१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल संघानं प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत १८० धावा केल्या. प्रणयने १०९ चेंडूंत नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याला रुद्र टंकने २९ धावांची साथ दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयईएस न्यू स्कूल संघाचा डाव २६.१ षटकांत ९२ धावांवर गडगडला. स्वामी विवेकानंद स्कूलने हा सामना ८८ धावांनी जिंकून जेतेपदाला गवसणी घातली.

१४ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत औवाब कुन्नीने ९८ चेंडूंत १०६ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल ( वांद्रे) संघाने ४० षटकांत २ बाद २४७ धावा चोपल्या.

औवाबला अवैस खानने ७७ धावा करून चांगली साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( कांदिवली) संघाने संघर्ष केला. पण, त्यांना १३ धावांनी हार मानावी लागली. स्वामी विवेकानंद स्कूल संघाला ९ बाद २३४ धावा करता आल्या.

मुलींच्या उपांत्य फेरीत शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश स्कूल ( दादर) संघाने ४८ धावांनी आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) संघावर, तर सेंट कोलुम्बा स्कूल ( गामदेवी) संघाने ८ विकेट्स राखून स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) संघावर विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

१६ वर्षांखालील मुले ( अंतिम सामना)

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) ४० षटकांत सर्वबाद १८० ( प्रणय कपाडिया ६९*, रुद्र टंक २९) वि. वि. आयईएस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे) २६.१ षटकांत सर्वबाद ९२ धावा, ८८ धावांनी विजयी; सामनावीर – प्रणय कपाडिया ( १०९ चेंडूंत नाबाद ६९ धावा)

१४ वर्षांखालील मुले ( उपांत्य फेरी)

रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल ( वांद्रे) २ बाद २४७ ( औवाब कुन्नी १०६*, अवैस खान ७७) वि. वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( कांदिवली) ९ बाद २३४ धावा, १३ धावांनी विजयी; सामनावीर – औवाब कुन्नी ( ९८ चेंडूंत नाबाद १०६ धावा)

१६ वर्षांखालील मुले ( उपांत्य फेरी)

शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश स्कूल ( दादर) १५ षटकांत ७ बाद ७१ ( जेत्सून ची २६*, समिक्षा बांगल २०) वि. वि. आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) १५ षटकांत ७ बाद २३ धावा, ४८ धावांनी विजयी; सर्वोत्तम खेळाडू – जेत्सून ची ( २७ चेंडूंत नाबाद २६ धावा)

सेंट कोलुम्बा स्कूल ( गामदेवी) ११.४ षटकांत २ बाद ८० ( सलोनी कुश्ते ३०*, जीया एम १७) वि. वि. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) १९ षटकांत सर्वबाद ७८ धावा, ८ विकेट्स राखून विजयी; जीया मंद्रवाडकर ( १७ धावा आणि २ विकेट्स)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---