पुणे: चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या क्वालिफायर एलियास येमेर याने अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या रशियाच्या ऍस्लन कारास्तेवचा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या फेरीत येमेरने कारास्तेवचा 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करत अवघ्या 1तास 36 मिनिटात त्याचे आव्हान संपुष्टात आणले.
25 वर्षीय पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या येमेरने सामन्यात सुरेख सुरुवात करत कारास्तेवविरुद्ध 3-1 अशी आघाडी घेतली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या दक्षिण आशियातील एकमेव 250 एटीपी स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या कारास्तेवला लय गवसण्यात अडचणी येत होत्या.
कारास्तेवच्या 47टक्के सरासरी सर्व्हिस गुणांच्या तुलनेत येमेरने 76टक्के सर्व्हिस गुणांच्या जोरावर पहिला सेट सहजपणे विजय मिळवला. यामध्ये कारास्तेवने पाच डबल फॉल्ट केले.
रशियाचा स्टार खेळाडू कारास्तेवने गतवर्षी सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोविचवर सनसनाटी विजय मिळवला होता. पण येमेरने दुसऱ्या सेटमध्ये देखील सुरेख खेळ करत 4-4 अशी बरोबरी साधली. यानंतर येमेरने आपली सर्व्हिस राखत 2021मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पदार्पणातच उपांत्य फेरी गाठणाऱ्या कारास्तेवविरुद्ध बरोबरी साधली व हा सेट टायब्रेकमध्ये गेला.
यावेळी येमेर विजयानंतर आनंद व्यक्त करताना म्हणाला की, मी सामन्यात विशेषकरून माझ्या सर्व्हिसवर अधिक भर दिला. ज्यावेळी आपण सर्व्हिस योग्य करतो त्यावेळी नेहमीच सामन्यात विजय हा निश्चित असतो. सर्व्हिस ही महत्त्वाची गोष्ट आहे असे मला वाटते.
जागतिक क्रमवारीत 163व्या स्थानी असलेल्या येमेर याने टायब्रेकमध्ये वरचढ खेळ करत 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवली आणि आपली आघाडी कायम ठेवत कारास्तेवविरुद्ध विजय मिळवला.
यावेळी कारास्तेव म्हणाला की, एलियास हा चांगला खेळाडू आहे. सामन्याला माझ्याकडुन फारशी चांगली सुरुवात झाली नाही. दुसऱ्या सेटमध्ये मी त्यावर तोडगा काढत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय, अन्य लढतीत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या गतविजेत्या जेरी व्हेसलीने बर्नाबी झपाटा मिराईल्सचा 6-3, 6-4 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
सहाव्या मानांकित एमिल रुसूवोरी याने क्वालिफायर वित कोप्रिव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईद इन इंडिया संचालित या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आज संध्याकाळी भारताचा स्टार खेळाडू युकी भांब्री समोर आठव्या मानांकित स्टेफनो ट्रॅव्हालियाचे आव्हान असणार आहे.
याआधीच्या दुहेरीच्या बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सलामीच्या लढतीत एन श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन या जोडीने अर्जुन कढे व पूरव राजा यांचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजय मिळवला. बालाजी व वर्धन या भारतीय जोडीला जियानलुका आणि एमिल रुसूवोरी यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
निकाल: एकेरी: दुसरी फेरी:
एलियास येमेर(स्वीडन)वि.वि.ऍस्लन कारास्तेव(रशिया)[1] 6-2, 7-6(7-3);
एमिल रुसूवोरी(फिनलँड)[6]वि.वि.वित कोप्रिव्हा(चेक प्रजासत्ताक)6-3, 6-3;
जेरी व्हेसली(चेक प्रजासत्ताक)[4]वि.वि.बर्नाबी झपाटा मिराईल्स(स्पेन)6-3, 6-4;
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ शहरात विराट झळकावणार ‘शतक’, श्रीलंकेविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीसंदर्भात गांगुलीकडून अपडेट
धोनीचा अघोरी अवतार ठरतोय लक्षवेधी, ‘अथर्व: द ओरिजिन’चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलाय का?
कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर धवनने दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभारही केले व्यक्त