---Advertisement---

तमिळनाडू वि. कर्नाटकमध्ये रंगणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची फायनल, पाहा उपांत्य सामन्यातील कामगिरी

On: शनिवार, नोव्हेंबर 20, 2021 11:34 PM
---Advertisement---

भारताची प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ अंतिम चरणात आली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी संघ निश्चित झाले असून तमिळनाडू विरुद्ध कर्नाटक यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे. शनिवार रोजी (२० नोव्हेंबर) पहिल्या उपांत्य सामन्यात हैदराबादला ८ विकेट्सने पराभूत करत तमिळनाडूने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. तर याचदिवशी दुसरा उपांत्य सामना खेळताना कर्नाटकने विदर्भला ४ धावांनी धोबीपछाड दिला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

असा झाला पहिला उपांत्य सामना
साखळी फेरी आणि उपांत्यपूर्व साामन्यांतील दमदार प्रदर्शनानंतर कर्नाटक, विदर्भ, हैदराबाद आणि तमिळनाडू यांनी उपांत्य सामन्यांमध्ये प्रवेश केला होता. यातील पहिला उपांत्य सामना दिल्ली येथे हैदराबाद विरुद्ध तमिळनाडू यांच्यात रंगला होता. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाच्या तब्बल १० फलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या नाहीत. हैदराबादकडून तनय त्यागराजन याने सर्वाधिक २५ धावा केल्या. इतर फलंदाज साध्या १० धावाही जोडू शकले नाहीत. परिणामी १८.३ षटकात हैदराबादचा संघ केवळ ९० धावांवर गारद झाला.

तमिळनाडूकडून पी सर्वना कुमारने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. ३.३ षटके गोलंदाजी करताना २१ धावांवर त्याने हे बळी मिळवले. तसेच मुर्गन अश्विन आणि एम मोहम्मद यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.

हैदराबादच्या या नाममात्र ९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडूकडून कर्णधार विजय शंकरने सर्वाधिक ४३ धावा फटकावल्या. सलामी जोडी लवकरच पव्हेलियनला परतल्यानंतर ४० चेंडूंमध्ये १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. त्याच्या जोडीला साई सुदर्शनने नाबाद ३४ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. १४.२ षटकातच तमिळनाडूने हैदराबादचे आव्हान पूर्ण केले आणि अंतिम सामन्यात जागा निश्चित केली.

असा झाला दुसरा उपांत्य सामना
दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटक आणि विदर्भ हे संघ आमने सामने होते. नाणेफेक जिंकून विदर्भने प्रथम गोलंदाजी निवडली होती आणि कर्नाटक संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कर्नाटककडून सलामीवीर रोहन कदमने सर्वाधिक ८७ धावा चोपल्या. ५६ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. तसेच मनिष पांडेनेही कर्णधार खेळी करत ५४ धावा जोडल्या होत्या. इतर फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत आणि कर्नाटकने विदर्भला विजयासाठी १७७ धावांचे मोठे आव्हान दिले होते.

विदर्भकडून दर्शन नलकांडेने सर्वाधिक ४ विकेट्स काढल्या होत्या. तर ललित यादवनेही २ फलंदाजाला पव्हेलियनला धाडले होते.

कर्नाटकच्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. अथर्व तैडे (३२ धावा), गणेश सतिश (३१ धावा), कर्णधार अक्षय वाडकर (१५ धावा), शुभम दुबे (२४ धावा), जितेश शर्मा (१२ धावा), अपूर्व वानखेडे (२७ धावा) आणि अक्षय कर्नेवर (२२ धावा) यांनी छोटेखानी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. परंतु शेवटी ४ धावांनी त्यांना परावास सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुलने दिली नाही संधी; आता चार चेंडूत चार बळी घेत केली मलिंगाची बरोबरी

आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा

जहीर खानचे महत्वपूर्ण विधान; म्हणाला, “व्यंकटेशला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे म्हणजे…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---