अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बडोद्याचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघानं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईनं केवळ 3 गडी गमावून 16 चेंडू बाकी असताना सामना जिंकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं बडोद्याची गोलंदाजी फोडून काढली. रहाणेनं 56 चेंडूत 98 धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार मारले. रहाणेचं सलग तिसऱ्या डावात शतक हुकलं आहे. उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भाविरुद्ध त्यानं 45 चेंडूत 84 धावा केल्या होत्या. तर त्यापूर्वी आंध्र प्रदेशविरुद्ध तो 53 चेंडूत 95 धावा करून बाद झाला होता.
अजिंक्य रहाणेशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरनंही मुंबईसाठी दमदार फलंदाजी केली. मुंबईकडून अय्यरनं 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. अशा प्रकारे रहाणे आणि अय्यरच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं हा सामना सहज जिंकला. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉला उपांत्य फेरीत केवळ 8 धावा करता आल्या.
संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी दाखविणाऱ्या बडोदा संघानं उपांत्य फेरीत आपली लय गमावली. संघाकडून शिवालिक शर्मानं सर्वाधिक धावा केल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्यानं 30 आणि शाश्वत रावतनं 33 धावांचं योगदान दिलं. या तीन फलंदाजांशिवाय बडोद्याकडून अन्य कोणताही खेळाडू चमकू शकला नाही. बडोद्याकडून हार्दिक पांड्या, अतित सेठ, अभिमन्यू सिंग आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा –
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
“सचिन तेंडुलकरने मला मदत….”, विनोद कांबळीचा मोठा खुलासा
IND vs AUS: गाबा कसोटीत भारत दुहेरी संकटात, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर