देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१-२२ च्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. शाहरुख खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत कर्नाटकच्या स्वप्नांचा चुराडा केला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित वीस षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर तामिळनाडूने विजयी लक्ष्य गाठले. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.
१. तन्मय अग्रवाल:
हैदराबादच्या तन्मय अग्रवालने सात सामन्यांत ५५.६६ च्या सरासरीने ३३४ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४८.४८ होता. या स्पर्धेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ९७ अशी होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे. त्याने या स्पर्धेत ४ अर्धशतके केली आहेत.
२. दीपक हुडा:
राजस्थानच्या दीपक हुडाने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ६ सामन्यात १६८ च्या स्ट्राईक रेटने २९४ धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीची सरासरी ७३.५० होती. त्याने या स्पर्धेत १७ षटकार मारले. नाबाद ७५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने या स्पर्धेत चार अर्धशतके झळकावली.
३. अजिंक्य रहाणे:
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईकडून खेळताना ५ सामन्यात २८६ धावा केल्या. त्याने ५७.२० च्या सरासरीने या धावा केल्या. देशांतर्गत टी२० स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
४. अश्विन हेब्बर :
आंध्र प्रदेशचा फलंदाज अश्विन हेब्बरने शानदार फलंदाजी करताना पाच सामन्यांत २७९ धावा केल्या. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ७८.०० होती. त्याने १३३.४९ च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. नाबाद १०३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने ५ सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
५. चमा मिलिंद:
हैदराबादचा गोलंदाज चमा मिलिंदने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या. त्याने ७ सामन्यात १८ विकेट घेतल्या. ८ धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने या स्पर्धेत दोनदा ५ विकेट घेतल्या.
६. सीव्ही स्टीफन:
आंध्र प्रदेशच्या सीव्ही स्टीफनने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ५ सामन्यात १४ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा इकॉनॉमी रेट ६.०५ इतका राहिला. ११ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
७. अक्षय कर्णेवार :
विदर्भाचा गोलंदाज अक्षय कर्णेवारने ८ सामन्यात १३ विकेट्स घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट ४.३४ इतका राहिला. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर राहिला. ५ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.
८. ऋषी धवन :
हिमाचल प्रदेशच्या ऋषी धवननेही या स्पर्धेत आपली चमक दाखवली. त्याने ६ सामन्यात १४ विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट ७.१४ इतका होता. देशांतर्गत टी-२० स्पर्धांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.