- आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस सेकंडरी स्कूलवर मात
पुणे : सिंबायोसिस प्रायमरी संघाने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले आहे. अंतिम फेरीत सिंबायोसिस प्रायमरी संघाने सिंबायोसिस सेकंडरी संघाचे आव्हान ३-२ असे परतवून लावले.
प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस स्कूलमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत सिंबायोसिस सेकंडरीच्या आर्चन आपटेने आपल्या दोन्ही लढती जिंकून अंतिम लढतीत रंग भरले; पण त्याला इतर सहकाऱ्यांची साजेशी साथ लाभली नाही. आर्चनने प्रायमरीच्या सनत जैनला पहिल्याच सामन्यात ११-१, ११-८ असे नमवून सेंकडरीला छान सुरुवात करून दिली; पण दुसºयाच सामन्यात प्रायमरीच्या वेदांग जोशीने चुरशीच्या लढतीत सेकंडरीच्या अर्णव भालवलकरचे आव्हान ११-७,४-११, ११-८ असे परतवून लावत प्रायमरीच्या गुणांचे खाते उघडले. प्रायमरी संघाच्या आर्यन इंगळेने सोहम जामसांडेकर विरुद्धची लढत ११-४, १३-११ अशी जिंकून प्रायमरी संघाची आघाडी वाढवली; पण आर्चन आपटेने पुढील लढतीत वेदांग जोशीला १५-१३, ११-७ असे हरवून सिंबायोसिस सेकंडरी संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. मात्र निर्णायक लढतीत सिंबायोसिस प्रायमरीच्या सनत जैनने अर्णव भालवलकरवर ११-७, ११-९ असा विजय मिळवून प्रायमरीचे विजेतेपद निश्चित केले. दरम्यान,अभिनव इंग्लिश स्कूलने अमनोरा स्कूलवर ३-० ने मात करून तिसरा क्रमांक पटकावला.
निकाल- १४ वर्षांखालील मुले- अंतिम लढत
१) सिंबायोसिस प्रायमरी वि. वि. सिंबायोसिस सेकंडरी ३-२ (सनत जैन पराभूत वि. आर्चन आपटे १-११, ८-११; वेदांग जोशी वि. वि. अर्णव भालवलकर ११-७, ४-११, ११-८; आर्यन इंगळे वि. वि. सोहम जामसांडेकर ११-४, १३-११; वेदांग जोशी पराभूत वि. आर्चन आपटे १३-१५, ७-११; सनत जैन वि. वि. अर्णव भालवलकर ११-७, ११-९.)
२) तिसरा क्रमांक : अभिनव इंग्लिश स्कूल वि. वि. अॅमनोरा स्कूल ३-० (कौशल कुलकर्णी वि. वि. क्षीतिज शहा ११-२, ११-५; आयुष जायदे वि. वि. सूरज मिश्रा ११-८, ११-८;असिम केळकर वि. वि. एच. लिंगेश्वर राव ११-८, ११-५).