भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा सध्या धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याची आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये निराशाजनक सुरूवात झाली. त्याला तिन्ही साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, मात्र तो तिन्ही सामन्यात शून्यावरच बाद झाला. यानंतर नेमके त्याचे काय चुकत आहे, तो कुठे कमी पडतोय आणि तो कधी फॉर्ममध्ये परतणार याच्या चर्चा सुरू झाल्या. आता भारताचा दिग्गज फिरकीपटू तो कुठे कमी पडतोय आणि त्याने काय करावे, याबाबत सांगितले आहे.
आर अश्विन त्याच्या उत्तम विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे. त्याने अभिषेकने काय करावे आणि तो कुठे चुकतोय याबद्दल सांगितले आहे. अश्विन म्हणाला, “आता आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना अभिषेकच्या खेळण्याचे कौशल्य माहित झाले आहे. सध्या मैदानावर एक नवा ट्रेंड बनला आहे की गोलंदाज त्याला खेळण्याची संधीच देत नाही. सर्व गोलंदाज त्याच्या खूप जवळ चेंडू टाकतात आणि अभिषेक त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फ्रंट लेग हटवून जोरात बॅट घुमवतो. जेव्हा चेंडू शरीराजवळ येतो, तेव्हा त्याला शॉट मारण्याची संधीच मिळत नाही.”
“नेदरलॅंड्सविरुद्ध गोलंदाज आर्यन दत्तने याच रणनीतीचा वापर केला. त्याचा चेंडू आतमध्ये येत अभिषेकच्या शरीराच्याबरोबर एका रेषेत आला. नव्या चेंडूमुळे असे होत असल्याने अभिषेकला त्याचे नुकसान होत आहे. तेव्हा तो त्याच्या बरोबर पोजीशनमध्ये नव्हता, असेही अश्विन पुढे म्हणाला आहे.
अभिषेकने त्याच्या खेळण्याच्या पद्धतीत काय सुधारणा केली पाहिजे, याबद्दल सांगताना म्हटले,”जसे शिवम दुबेने केले. शिवम त्याचा पाय हटवतो, मात्र त्याचे डोके बरोबर चेंडूच्या रेषेत असते. यामुळे अभिषेकनेही नव्या चेंडूचा सामना करताना केवळ पायच हटवू नये आणि डोके पुढे करत संयमाने खेळले पाहिजे. पॉवरप्लेमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी त्याने त्याच्या फुटवर्कवर काम केले पाहिजे.”
अश्विनच्या मते, एक किंवा दोन सामन्याच्या कामगिरीवर खेळाडूला बाहेर नाही केले पाहिजे. अभिषेक एक महत्वाचा खेळाडू असून तो पॉवरप्लेमध्ये खतरनाक सिद्ध होऊ शकतो.






