टी-२० विश्वचषकात शनिवारी (०६ नोव्हेंबर) दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या केली. फलंदाजांनी केलेल्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात १० धावांनी विजय मिळवला. दरम्यान इंग्लंड संघासाठी लियाम लिविंगस्टोनने १७ चेंडूत २८ धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्याने मारलेल्या या तीन षटकारांपैकी एक षटकार खूपच लांब मारला. त्याने मारलेला हा मोठा षटकार टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला आहे.
इंग्लंडच्या डावाच्या १६ व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळी डेविड मलान आणि लियाम लिविंगस्टोन हे दोन इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित होते. रबाडाच्या षटाकाच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी लिविंगस्टोन स्ट्राईकवर होता. रबाडाने टाकलेला षटकाचा पहिलाच चेंडू लिविंस्टोनने सीमारेषेबाहेर पाठवला. त्याने मारलेला हा षटकार ११२ मिटरचा असून यंदाच्या टी२० विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकार आहे.
त्यानंतर लिविंस्टोनने रबाडाच्या षटकात पुढच्या दोन चेंडूवर लागोपाठ दोन षटकार मारले आणि त्याची षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. रबाडाच्या या षटकात लिविंस्टोनने केलेल्या धुलाईमुळे इंग्लंडला १९ धावा मिळाल्या. विशेष म्हणजे, रबाडाने याच सामन्यात विकेट्सची हॅट्रिक घेतली. परंतु लिविंगस्टोनने त्याला जबरदस्त चोप दिला.
https://twitter.com/RaunitRanjan2/status/1457037406738137091?s=20
https://www.instagram.com/reel/CV8WcAylccD/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, सामन्यात सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी घेतलेला हा निर्णय दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकात फक्त दोन विकेट्स गमावल्या आणि १८९ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या रासी वान डर ड्यूसेन ६० चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९४ धावा केल्या. तसेच एडम मार्करमने २५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंड संघ मर्यादित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा करू शकला. यामध्ये मोईन अलीने २७ चेंडूत सर्वाधित ३७ धावा केल्या. याव्यतिरिक्त डेविड मलानने २६ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजांमध्ये दक्षिण अफ्रिकेसाठी रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि ४८ धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटसेने’ला मिळाली उपांत्य फेरीत पोहोचण्याची किल्ली! अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज दुखापतीतून सावरला
अफलातून! स्टार्कच्या गोलंदाजीवर रसेलने ठोकला टी-२० विश्वचषकातील सर्वात लांब षटकार, पाहून फिंचही थक्क






