टी२० विश्वचषकातील उपांत्या सामन्यासाठीचे चारही संघ निश्चित झाले आहेत. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केले आणि उपांत्य सामन्यात धडक मारली. सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि १२४ धावा केल्या. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात अवघ्या दोन विकेट्सच्या नुकसानावर १८.१ षटकात हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने खास प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधार केन विलियम्सनने या सामन्यात मिळवलेल्या विजयाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. विजयानंतर तो म्हणाला की, “हे एक मजबूत प्रदर्शन होते. आम्हाला माहित आहे की, अफगाणिस्तानचा संघ किती खतरनाक आहे. त्यांच्याकडे सगळ्या विभागांमध्ये विजय मिळवून देणारे खेळाडू आहेत. पहिल्यांदा चेंडूसोबत सामन्याचा कल झुकवणे चांगले होते, सुरुवातीच्या काही विकेट्स घेणे नेहमी चांगले असते.”
तो पुढे म्हणाला, “दुसऱ्या डावात आम्हाला माहित होते की, वेगात खेळणे धोकादायक आहे. अशात आम्ही सामन्याच्या जेवढे जवळ जाऊ शकत होतो, तेवढे जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आम्हीही फलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला असता. तीन वेगवेगळ्या जागेवर खेळण्यासाठी जुळवून घेणे एक आव्हान आहे. हेच खेळाचे सौंदर्य आहे. आम्हाला माहीत आहे की, काही दिवसात आमच्या पुढे अजून एका मजबूत संघाचे आव्हान येणार आहे, पण संघासाठी आजची कामगिरी सुखावणारी होती. क्षेत्ररक्षणामध्येही चांगले प्रयत्न केले गेले. दिवसा होणाऱ्या सामन्यामध्ये ऊर्जा मिळवणे महत्वाचे असते.”
तो पुढे बोलताना म्हणाला की, “इंग्लंडचा संघ खूप मजबूत आहे. आम्ही ज्याप्रकारचे क्रिकेट खेळले आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करून शिकण्याची गरज आहे. ही स्पर्धा अवघड आहे आणि आम्ही कठीण सामनेही पाहिले आहेत. आम्ही पुढच्या संधीकडे पाहत आहोत.”
दरम्यान, न्यूझीलंड गट दोन मधील उपांत्य सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तनला पराभुत केल्यामुळे भारतीय संघ उपांत्य सामन्यात पोहोचू शकणार नाही. अफगाणिस्तान संघ जर न्यूझीलंडविरुद्ध जिंकला असता, तर भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी संधी होती.





