टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा दोन दिग्गज संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला आठ विकेट्स राखून पराभूत केले. भारतीय संघ या पराभवानंतर स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. यानंतर या पराभवासाठी आणि एकंदरीत भारतीय संघाच्या विश्वचषकातील प्रदर्शनासाठी कर्णधार विराट कोहलीला जबाबदार ठरवले जात आहे. अशात भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी विराटची पाठराखण करत प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाला यासाठी जबाबदार ठरवले आहे.
भारतीय संघाला याआधीच्या सामन्यात पाकिस्ताकडून १० विकेट्सने मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंडविरुद्ध मिळालेला पराभव भारतीय संघासाठी विश्वचषकातील सलग दुसरा पराभव ठरला आहे. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आणखी खडतर झाला आहे. त्याचमुळे भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले आहे.
पण, माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद अजहरुद्दिन यांनी विराटची पाठराखण करताना एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “विराट कोहलीला टीकांचा सामना करावा लागत आहे, पण पूर्ण संघ आणि सर्व प्रशिक्षक आहेत, जे अपयशी ठरले आहेत, फक्त एक व्यक्ती नाही. हे भारतीय चाहत्यांसाठी एक भीतीदायक हॅलोवीन ठरले आहे.”
Virat Kohli is facing criticism but it’s the entire team and the coaches that have failed and not just one man.
It turned out to be a scary Halloween for Indian fans. #INDvsNZ #T20WORLDCUP— Mohammed Azharuddin (@azharflicks) October 31, 2021
दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली होती आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भारताने मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या ११० धावा केल्या. यामध्ये रवींद्र जडेजाच्या सर्वाधिक आणि नाबाद २६ धावांचा समावेश होता.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १४.३ षटकांमध्ये आणि २ विकेट्सच्या नुकसानावर भारताने दिलेले लक्ष्य गाठले. यामध्ये त्यांच्या सलामीवीर डॅरिल मिशेलने सर्वाधित ४९ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार केन विलियम्सनने ३३ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडच्या इश सोढीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने या सामन्यात चार षटकांमध्ये १७ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध भारताने केल्या ‘या’ पाच चुका, ज्यामुळे संघाला करावा लागला पराभवाचा सामना
भारताच्या पराभवाचे ‘आयपीएल कनेक्शन’; ‘ही’ आहेत धक्कादायक कारणे
भारताच्या पराभवानंतर ‘मेंटर धोनी’ होतोय ट्रेंड; चाहते म्हणाले…