न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचे तोंड भरून कौतुक केले आहे. टी२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला पाच विकेट्स राखून पराभूत केले. पाकिस्तान संघाचा टी२० विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय ठरला आहे.
सामन्यात न्यूझीलंडच्या झालेल्या पराभवानंतर त्यांचा कर्णधार केन विलियम्सनने पाकिस्तानने केलेल्या प्रदर्शनाचेही कौतुक केले आहे. विलियम्सनच्या मते पाकिस्तानने अंतिम षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.
विलियम्सन म्हणाला की, “दुर्दैवाने आम्ही आमच्या रणनीतीप्रमाणे खेळू शकलो नाही आणि जर आपण विरोधी संघाचे निरिक्षण केले, तर अंतिम षटकांमध्ये त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि आम्हाला संधी दिली नाही. त्यांची गोलंदाजी उच्च पातळीची होती. आम्हाला या पराभवातून काही धडा घेऊन पुढे जावे लागेल. अशाप्रकारच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळते, पण पाकिस्तानने खूप चांगले प्रदर्शन केले. तसेच अवघड खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे सामन्याचा शेवट केला.”
पाकिस्तानचे गोलंदाज विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. भारताविरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यातही त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि भारतीय संघाला अपेक्षित धावसंख्या करता आली नव्हती. या सामन्यात शाहीन अफ्रिदीने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करून तंबूत पाठवले होते.
याच पार्श्वभूमीवर विलियम्सन पुढे बोलला आहे. “गोलंदाजांनी आज अप्रतिम प्रदर्शन केले, जसे की त्यांनी पहिल्या सामन्यात केले होते आणि त्यांच्याकडून अशीच अपेक्षा होती. ते सतत चांगले प्रदर्शन करत आहेत,” असेही विलियम्सन म्हणाला.
दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य १८.४ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले आणि विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब अख्तर म्हणतोय, ‘न्यूझीलंडला पराभूत करून आम्ही भारताला वाचवले, चांगले शेजारी असंच करतात’
‘मला वाटतं सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्या आयपीएल संघ विकत घेऊ शकतात’, ललित मोदींनी साधला निशाणा
टी२० क्रमवारीत मोठे फेरबदल; रिजवानने मिळवले चौथे स्थान, तर विराट-केएलला मोठे नुकसान