टी२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतील गुरुवारी (२१ ऑक्टोबर) ब गटामधील संघांचे अखेरचे सामने पार पडले. या गटात समावेश असलेले स्कॉटलंड आणि ओमान हे संघ गुरुवारी आमने-सामने होते. या सामन्यात स्कॉटलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला आणि सुपर १२ फेरीत दणक्यात प्रवेश केला. हा स्कॉटलंडचा सलग तिसरा विजय ठरला आहे.
या विजयासह स्कॉटलंडने ब गटात ६ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला. त्यामुळे आता सुपर १२ फेरीसाठी त्यांचा समावेश दुसऱ्या गटात झाला आहे. या गटात भारत, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघाचा समावेश आहे. याबरोबरच पहिल्या फेरीतील अ गटातील एका संघाचाही सुपर १२ साठी दुसऱ्या गटात समावेश होईल.
स्कॉटलंडचा ओमानवर विजय
गुरुवारी झालेल्या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करत स्कॉटलंड समोर १२३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग स्कॉटलंडने २ विकेट्स गमावत केवळ १७ षटकांत १२३ धावा करत पूर्ण केला.
स्कॉटलंडकडून कर्णधार केली कोएत्झर आणि जॉर्ज मुन्सी यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. पण, चांगल्या सुरुवातीनंतर मुन्सी २० धावा करुन बाद झाला. पण नंतर मॅथ्यू क्रॉसने कर्णधाराला चांगली साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचली. पण, कोएत्झर २८ चेंडूत ४१ धावांवर खावर अलीविरुद्ध त्रिफळाचीत झाल्याने ही भागीदारी मोडली.
मात्र, अखेर क्रॉससह रिची बेरिंग्टनने फलंदाजी करताना स्कॉटलंडला विजयापर्यंत पोहचवले. क्रॉसने नाबाद २६ धावा केल्या आणि रिची बेरिंग्टनने नाबाद ३१ धावा केल्या. ओमानकडून फयाझ बट आणि खावर अली यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांची सुरुवात खराब झाली. जतिंदर सिंग पहिल्याच षटकात शुन्यावर धावबाद झाला. पण, आकिब इलियास या सलामीला आलेल्या फलंदाजाने थोडीफार झुंज देत ३५ चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र, त्याला नंतर हवी तशी साथ मिळाली नाही. तसेच तोही १० व्या षटकात ओमानच्या तिसऱ्या विकेटच्या रुपात बाद झाला. यानंतरही ओमानचा संघ आपला डाव सावरु शकला नाही.
तरी, मोहम्मद नदीम आणि कर्णधार झिशान मकसूदने थोडेफार प्रयत्न केले. पण तेही चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करु शकले नाहीत. नदीमने २५ धावा आणि झिशान मकसूदने ३४ धावा केल्या. याव्यतिरिक्त ओमानच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. त्यामुळे ओमान संघाला २० षटकात १० बाद १२२ धावाच करता आल्या.
स्कॉटलंडकडून जोश डेवीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच सफीआन शरीफने आणि मायकेल लीस्कने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर, मार्क वॅटने १ विकेट घेतली.
स्कॉटलंडचा सगल तिसरा विजय
स्कॉटलंडने ओमानपूर्वी बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी या दोन संघांचा टी२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत पराभव केला आहे. त्यामुळे स्कॉटलंडसाठी या स्पर्धेची सुरुवात तीन सलग विजयांसह शानदार झाली आहे. आता त्यांना सुपर १२ फेरीतही अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग
विराटला गोलंदाजी करताना पाहून स्मिथही फुटले हसू, गमतीने केली गोलंदाजीची नक्कल; पाहा व्हिडिओ
बांगलादेशने नोंदवला टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; पीएनजीचा पराभव करत सुपर-१२ मध्ये केला प्रवेश