बांगलादेश क्रिकेट संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर१२ साठी पात्रता मिळवली आहे. बांगलादेश संघाने गट-ब च्या शेवटच्या सामन्यात पापुआ न्यु गिनीचा ८४ धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. बांगलादेशने प्रथम खेळताना ७ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनीचा संघ केवळ ९७ धावा करू शकला.
डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने ४ षटकांत ९ धावा देऊन ४ बळी घेतले. याशिवाय त्याने ४६ धावाही केल्या. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा संघ स्कॉटलंडकडून हरला होता. पापुआ न्यू गिनीने(पीएनजी) त्यांचे तीनही सामने गमावले आहेत.
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीएनजीचा डाव झटपट आवरला गेला. पीएनजीच्या संघाने २४ धावांत ५ गडी गमावले. पीएनजीच्या सुरुवातीच्या सात खेळाडूंपैकी कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. आठव्या क्रमांकावर उतरलेल्या किप्लिन दोरीगाने नाबाद ४६ धावा करत संघाला ९० धावांच्या पुढे नेले. संघ १९.३ षटकांत ९७ धावांवर सर्वबाद झाला.
बांगलादेशकडून शाकिब व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन आणि तस्किन अहमदने २-२ विकेट्स घेतल्या. याआधी २०१६ मध्ये बांगलादेशने ओमानचा ५४ धावांनी पराभव करून आपला सर्वात मोठा विजय नोंदवला होता.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद नईम (०) पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर लिटन दास (२९) आणि शाकिब अल हसन (४६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. माजी कर्णधार मुशफिकुर रहिमला केवळ ५ धावा करता आल्या.
बांगलादेशने संघाने १०१ धावांवर ४ गडी गमावले होते. पण कर्णधार महमूदुल्लाहने ५० धावा करून संघाची धुरा सांभाळली. त्याने २८ चेंडूंचा सामना केला. त्याने आपल्या डावात ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. आफिफ हुसेनने १४ चेंडूत २१ धावा केल्या, तर सैफुद्दीनने ६ चेंडूत नाबाद १९ धावा केल्याने बांगलादेश संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी बाद १८१ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ला मिळतोय चांगलाच प्रतिसाद; सेहवागने ओलांडला लाखो फॉलोअर्सचा टप्पा
Video: भारतीय खेळाडूंनी घेतले ‘डाल्गोना कँडी’ चॅलेंज, पाहा कोण झालं पास अन् कोण झालं फेल
पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडली भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; इशान किशन, आर अश्विनला दिला डच्चू






