टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) भारतीय संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. सामन्यात स्कॉटलंडने भारतासमोर अवघ्या ८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने अवघ्या ६.५ षटकात गाठले आणि विजय मिळवला. यानंतर भारताच्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा झाली आणि संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया देताना या सामन्याची तुलना सराव सामन्याशी केली आहे.
भारतीय संघाचा हा विश्वचषकातील दुसरा विजय होता. ग्रूप दोनमधील पाकिस्तान संघ आधीच उपांत्य सामन्यात पोहोचला आहे. आता भारताला उपांत्य सामना गाठण्यासाठी न्यूझीलंडला मागे टाकावे लागणार आहे. न्यूझीलंड संघ रविवारी (०७ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध भिडणार असून या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला, तर भारतीय संघ उपांत्य सामन्याच्या स्पर्धेत कायम राहणार आहे.
स्कॉटलंडविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर विराट कोहली म्हणाला की, “आमचे गोलंदाज खूपच अप्रतिम होते आणि त्यानंतर केएल आणि रोहितने खूपच अप्रतिम खेळ दाखवला. सामना सुरू होण्यापूर्वी ८ ते १० षटकांमध्ये हे करण्याविषयी चर्चा झाली होती. आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रहार करण्याकडे पाहत नव्हतो, कारण अशात जर जास्त विकेट्स पडल्या असत्या, तर मग २० चेंडूही जास्त घेतले असते, तरी ते महागात पडले असते. आम्ही विचार केला की, जर आम्ही आमचा स्वाभाविक खेळ खेळला, तर धावा आपोआप बनत जातील.”
“जर तुम्ही आमचे सराव सामने पाहिले, तर एकदम अशीच फलंदाजी करत आलो आहोत. फक्त एक दोन झटके लागले, जेथे आम्हाला सलग दोन चांगली षटके मिळाली नाहीत. संघाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि दबाव बनवून ठेवला, पण आम्ही फक्त त्या दोन षटकांमध्ये चांगली फलंदाजी करण्यापासून लांब होतो,” असे विराट पुढे म्हणाला.
दरम्यान, भारत आणि स्कॉटलंडमधील सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर स्कॉटलंडने पूर्णपणे शरणागती पत्करली. डावाच्या १७.४ षटकात स्कॉटलंड संघ सर्वबाद झाला आणि भारतासमोर विजयासाठी ८६ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय सलामीवीरांनी केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर संघाने अवघ्या ६.३ षटकात सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”