टी २० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होण्याधीच बांग्लादेशने माघार घेतली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटनेही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेत गोंधळ निर्माण केला होता. आता पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निश्चित केले आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बांग्लादेश आणि पाकिस्ताननेच सामने न खेळण्याचा निर्णय घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेक संघांनीही याआधी विश्वचषक स्पर्धा टाळण्याचा निर्णय घेतला आहे, ते जाणून घेऊ.
इंग्लंडनेही झिम्बाब्वेला जाण्यास मनाई केली होती. २००३च्या विश्वचषकात हे घडले होते. हा निर्णय इंग्लंडच्या सरकारने घेतला होता. त्याही स्पर्धेत इंग्लंडच्या बहिष्कारनंतर झिम्बाब्वेला दोन अंक मिळाले होते. त्यावेळी इंग्लंडने आयसीसीकडे त्यांचे सामने दुसरीकडे हलवण्याची मागणी केली होती, मात्र ती नाकारली गेली.
या घटनेचा परिणाम २००९च्या टी२० विश्वचषकातही दिसला. त्यावेळी झिम्बाब्वेला ती स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंडला जायचे होते, मात्र त्यांच्या खेळाडूंना व्हिजा मिळणार नाही या दृष्टीने त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. यामध्येही स्कॉटलंडला संधी मिळाली. त्यांनी झिम्बाब्वेची जागा घेतली. आगामी विश्वचषकातही त्यांनी बांग्लादेशची जागा घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनेही विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे नाकारले होते. १९९६चा विश्वचषक श्रीलंकेमध्ये खेळला गेला. तेथे युध्दजन्य परिस्थिती होती. ती स्पर्धा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेने आयोजित केली होती. त्यातील साखळी फेरीत श्रीलंकेला १० अंक मिळाले होते. त्यांनी नंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
ऑस्ट्रेलियाने १९ वर्षाखालील २०१६च्या विश्वचषकातही खेळण्यास मनाई केली होती. ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये खेळली गेली. त्यांच्याजागी मग आयर्लंडला संधी मिळाली. २०२१मध्ये न्यूझीलंडच्या १९ वर्षाखालील संघाने क्वारंटाईनच्या नियमांमुळे २०२२च्या विश्वचषकातून माघार घेतली होती. त्याही वेळी स्कॉटलंडलाच संधी मिळाली होती.
आताही पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नाकारले तर भारताला दोन अंक मिळण्याची दाट शक्यता आहे.






