---Advertisement---

टी20 वर्ल्डकपमध्ये नवा इतिहास! इंग्लंडविरुद्ध ‘या’ गोलंदाजाने कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 5:49 PM
---Advertisement---

कोणत्याही स्पर्धेतील सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणे ही विशेष बाब असून गोलंदाजासाठीही हा क्षण विसरता न येण्यासारखा असतो. हीच कामगिरी जर आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात केली, ते पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तर त्याला एक वेगळेच महत्व प्राप्त होते.

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाचवा सामना आज (८ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये नेपाळच्या शेर मल्ला याने ही खास कामगिरी केली आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने इंग्लंडच्या डावातील दुसरे षटक टाकले. त्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने फिल सॉल्टला बाद केले.

तसेच नेपाळकडून अशी कामगिरी करणारा मल्ला केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी पारस खडका याने केली होती. त्याने २०१४च्या टी२० विश्वचषकात आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. त्याने चितगावमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हॉंग कॉंगच्या इरफान अहमदला बाद केले होते.

आणखी विशेष बाब म्हणजे मुल्लाला त्याच्या पदार्पणाची कॅप माजी कर्णधार पारस खडकानेच दिली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने जेकॉब बेथल आणि कर्णधार हॅरी ब्रूकच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ७ विकेट्स गमावत १८४ धावा केल्या आहेत. यामध्ये विल जॅक्सनेही प्रभावी खेळी केली. त्याने १८ चेंडूत एक चौकार आणि ४ षटकार लगावत नाबाद ३९ धावा केल्या.

नेपाळकडून संदीप लामिछाने याची गोलंदाजी इकॉनॉमी रेटच्या बाबतीत उत्तम राहिली. त्याने ४ षटकात २५ धावा देत एक विकेट घेतली. मल्लाने ३ षटकात ३५ धावा देत एक विकेट घेतली. तसेच दिपेंद्र सिंग ऐरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या आहेत.

नेपाळ तिसऱ्यांदा ही स्पर्धा खेळत आहे. याआधी ते २०१४ आणि २०२४मध्ये खेळले आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या संघाच्या या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारतानंतर सर्वाधिक तिकिटे ही याच संघाची विकली गेली आहेत. कारण त्यांचे या स्पर्धेतील सर्व गटाचे सामने वानखेडे स्टेडियमवरच खेळले जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---