पाकिस्तानने टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत असून, यामुळे बोर्डाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयावर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) आश्चर्य व्यक्त केले आहे. दादा म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे थक्क करणारा आहे. मुळात पाकिस्तान त्यांचे सामने श्रीलंकेत खेळत आहे. तुम्ही विश्वचषक जिंकण्यासाठी येता, अशा वेळी प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो आणि तुम्ही असे गुण गमावू शकत नाही. पीसीबीच्या या भूमिकेमुळे मी हैराण आहे, पण शेवटी हा त्यांच्या बोर्डाचा निर्णय आहे.
पाकिस्तान आपल्या या निर्णयावरून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. सध्या आयसीसी (ICC) आणि पीसीबी यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. आयसीसीने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर, पाकिस्तान 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध खेळण्यास संमती देऊ शकतो, असे मानले जात आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही पीसीबीला पत्र लिहून या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान बोर्ड सध्या आपल्या सरकारशी चर्चा करत असून, लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.






