पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. यामध्ये शेवटच्या क्षणी एका युरोपियन संघाची निवड झाली. बांग्लादेशने या स्पर्धेतून माघार घेतल्याने स्कॉटलंडला खेळण्याची संधी मिळाली आहे, मात्र त्यांच्या एका खेळाडूचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्नभंग होण्याची शक्यता आहे.
स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज सफयान शरिफ याला व्हिजाच्या अडचणीमुळे आगामी टी२० विश्वचषकाला मुकावे लागेल. तसेच त्याला व्हिजा मिळू शकतो, मात्र वेळ लागले असे स्कॉटलंड क्रिकेटचे कार्यकारी अध्यक्ष ट्रुडी लिंडब्लेड यांनी सांगितले. तो मूळचा पाकिस्तानचा आहे.
बांग्लादेशने सुरक्षेच्या कारणामुळे या स्पर्धेतून माघार घेतली. आयसीसीने त्यांना भारतात सुरक्षेचा काहीच प्रश्न नसल्याचे सांगितले होते, मात्र तरीही त्यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत स्कॉटलंड ७ फेब्रुवारीला कोलकातामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे.
भारताच्या नियमानुसार मूळ पाकिस्तानचे नागरिकत्व असणाऱ्यांना व्हिजा मिळण्यास उशिर लागतो. “आम्ही आयसीसीसोबत याची प्रक्रिया पूर्ण करू. व्हिजा मिळणे कठीणच असते मग तुमच्याकडे ३ दिवस असू द्या किंवा ४५”, असे लिंडब्लेड यांनी सांगितले.
“त्यांचा सपोर्ट स्टाफ आणि इतर अधिकारी खेळाडूंना लवकरात लवकर व्हिजा मिळावा याचे प्रयत्न करत आहोत. शक्य होईल तितक्या लवकर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. व्हिजा मिळवण्यासाठी बीसीसीआयकडून आम्हाला मदत मिळण्याची आशा आहे. विश्वचषकासाठी आंमत्रित संघाचे भारतात पोहोचणे महत्वाचे आहे.”, असेही लिंडब्लेड पुढे म्हणाले.
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या सफयानचे वडील पाकिस्तानी वंशांचे आहे, तर आई ब्रिटिश-पाकिस्तानी आहे. तो सात वर्षाचा असताना स्कॉटलंडमध्ये स्थायिक झाला.
तसेच व्हिजाच्या प्रक्रियेत उशिर होण्याच्या शक्यतेने स्कॉटलंडने जे राखीव खेळाडू निवडले आहेत, त्यांच्याही व्हिजा तयार ठेवण्यास सांगितले आहे. कारण वेळेवर काहीही घडू शकते.
या स्पर्धेत स्कॉटलंड २ आणि ३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये सराव सामने खेळणार आहे. हे सामने अफगाणिस्तान आणि नामिबियाविरुद्ध होणार आहेत. या स्पर्धेसाठी स्कॉटलंडचा समावेश गट क (सी) मध्ये आहे. यामध्ये इटली, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि नेपाल हे संघ आहेत.
टी२० विश्वचषक २०२६साठी स्कॉटलंडचा संघ-
रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेविडसन, ख्रिस ग्रीव्ह्स, झैनुल्ला एहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमलेन, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.





