भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Verma) सध्या आपल्या फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरत आहे. या स्पर्धेत त्याला अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही आणि त्याचा स्ट्राइक रेटही चिंतेचा विषय बनला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी तिलकचा फॉर्म चाहत्यांसाठी टेन्शन वाढवणारा आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. त्याच्या फॉर्मवर भारतीय फलंदाजी प्रशिक्षकांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सितांशु कोटक (Sitanshu kotak on Tilak Verma) यांनी तिलकच्या फॉर्मवर पूर्ण विश्वास दाखवला. ते म्हणाले, तिलक वर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यात कोणतीही अडचण नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. त्याच्यासाठी स्ट्राईक रेट वाढवणे हा केवळ दोन चौकारांचा विषय आहे. एक-दोन मोठे फटके मारले की फलंदाज 30-40 धावांपर्यंत सहज पोहोचतो. कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भागीदारीवर आमचा भर होता आणि आम्ही ती मिळवली सुद्धा.
या विश्वचषकात त्याने आतापर्यंत सर्व 5 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 5 सामन्यांत त्याने एकूण 107 धावा केल्या असून 31 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या (नेदरलँड्सविरुद्ध) आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात तो केवळ 1 धावेवर बाद झाला. गेल्या 10 डावांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 120 पेक्षाही कमी राहिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तिलक वर्माची टी-20 कारकीर्द आतापर्यंत शानदार राहिली आहे. त्याने भारतासाठी खेळताना 44.48 च्या सरासरीने 1290 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 शतकांचाही समावेश आहे.






