भारत आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डची (पीसीबी) नाटके सुरू झाली. झाले असे की, या स्पर्धेत ते भारतासोबत एकाच गटात आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार होता. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार असूनसुद्धा पाकिस्तानने त्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) त्यांना विचार करायला लावला असून आता युएईनेही त्यांना फटकारले आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, युनाईटेड अरब अमिराती क्रिकेट बोर्डने पीसीबीला एक मेल पाठवल्याचे कळते. त्यामध्ये युएईने पाकिस्तानला त्यांच्या निर्णयावर विचार करावा असे सांगितले आहे. तसेच त्यांच्या या निर्णयामुळे असोसिएट देशांवर त्याचा वाईट परिणाम होतो, असेही नमूद केले आहे.
त्या पत्रात अमिराती क्रिकेट बोर्डने पाकिस्तानला त्यांच्या संकटाच्यावेळी मैदाने उपलब्ध करून दिली. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांवेळीही मदत केली. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या भुमिकेत युएईचाही हात आहे. त्यामुळे भारताविरुद्ध सामन्यांवर बहिष्कार हा नुकसान करणारा निर्णय आहे, असे मत मांडले आहे.
‘टी२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील कोणत्याही एका सामन्याचे प्रसारण रद्द होणे याचा परिणाम अनेक पातळीवर होतो. त्यामुळे स्पॉन्सरशिप आणि जगभरातील प्रेक्षकांवरही तो दिसून येतो. त्यामुळे पूर्ण प्रक्रियेवरच परिणाम होऊन अधिक नुकसान होते’, असेही युएईने त्या पत्रात म्हटले आहे.
श्रीलंका क्रिकेटनेही आर्थिक नुकसानीचे कारण देत पीसीबीला त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितला आहे. यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढत चालला आहे. अशातच आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांनीही भारत-पाकिस्तान सामना महत्वाचा असून तो रद्द करणे अशक्य आहे. त्यानंतर पीसीबीने आयसीसीसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.
त्या अटींमध्ये पाकिस्तानने संघाला आयसीसी उत्पन्नातील वाढलेला हिस्सा मिळावा, भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करावे आणि सामन्यात हँडशेक प्रोटोकॉल लागू करावा यांचा समावेश आहे. लाहोरमध्ये झालेल्या चर्चासत्रात ठरल्याप्रमाणे आयसीसीने उपाध्यक्ष इमरान ख्वाजा आणि एमिरेंट्स क्रिकेट बोर्डचे सरचिटणीस मुबाश्शिर उस्मानी यांना या प्रकरणात मध्यस्थीची जबाबदारी सोपवली आहे.
बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमान याचा करार आयपीएलच्या कोलकाताने बीसीसीआयच्या मंजुरीनंतर रद्द केला. तसेच दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या राजकीय तणावाचा हा परिणाम आहे. त्यामुळे बांग्लादेशने त्यांचे भारतात होणारे टी२० विश्वचषकातील सामने खेळण्यास मनाई करत सामन्यातून माघार घेतली. त्यांना पाठींबा म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचे ठरवले.






