भारतीय संघाने शुक्रवारी (५ नोव्हेंबर) टी-२० विश्वचषकातील आपला दुसरा विजय मिळवला. भारताने आपला दुसरा विजय हा स्कॉटलंडविरुद्ध मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पक्के केले. यानंतर भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय संघाने शुक्रवारी मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी भारतीय संघाचे आणि सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले की, “भारतीय संघाची निवड चांगली राहिली. मी असे या करणास्तव म्हणू शकतो की, अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले आहे आणि रोहितला डावाची सुरुवात करू दिली. दुसऱ्या सामन्यात त्यांनी रोहितला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरवले आणि हे दाखवले की, तुम्ही तुमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवत नाही.”
रोहित शर्माचे कौतुक करताना इंजमाम म्हणाले की, “रोहित एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील एक असा खेळाडू आहे, जो एकट्याच्या हिमतीवर सामन्याची दिशा बदलू शकतो. ज्याप्रकारची सुरुवात त्याने राशिद खानच्या विरोधात दाखवली, जो अफगाणिस्तानचा मुख्य खेळाडू आहे. त्याने हे निश्चित केले होते की, आता भारतीय संघाला लय मिळणार आहे.”
“त्याचे आक्रमण असे आहे, जे विरोधी संघाचे कंबरडे तोडते. जेव्हा त्याने राशिद खानला दोन षटकार मारले, तेव्हा दुसऱ्या गोलंदाजांवरही त्याचा प्रभाव पडला. हा आहे रोहितचा खरा क्लास. त्याची सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, तो विरोधी संघाच्या सर्वात चांगल्या गोलंदाजावर आक्रमण करतो. तो त्या सामन्यात कमाल खेळला. शमी जो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर दबावात दिसला होता, त्यानेही चांगले प्रदर्शन केले आणि तीन विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने अखेर तसा खेळ दाखवला, ज्यासाठी त्यांना ओळखले जाते,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
दरम्यान, भारत आणि स्कॉटलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती आणि स्कॉटलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करत १७.४ षटकात त्यांच्या सर्व विकेट्स गमावल्या आणि भारताला अवघ्या ८६ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी डावाची चांगली सुरुवात करून दिली. या दोघांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या ६.३ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. केएल राहुलने १९ चेंडूत ५०, तर रोहित शर्माने १६ चेंडूत ३० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी