अमरहिंद, डॉ.शिरोडकर यांनी आर्य सेवा मंडळ आयोजित ” ८३व्या कबड्डी क्रीडा महोत्सवात” अंतिम फेरीत धडक दिली. मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने ताडदेव येथील आर्य नगरात सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात अमरहिंदने शिवशक्तीचा १८-१५ असा पराभव करीत अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला.
अतिशय संथपणे खेळला गेलेल्या या सामन्यात मध्यांतराला ९-८अशी १ गुणांची आघाडी शिवशक्तीकडे होती. मध्यांतरानंतर अमरहिंदच्या श्रद्धा कदम, शाल्मली खडखे, सुप्रिया म्हस्के यांनी टॉप गियर टाकत संघाला १०गुणांची कमाई करून दिली. शिवशक्तीला अवघे ६गुण मिळविता आले. त्यामुळे अमरहिंदने हा सामना ३गुणांनी जिंकत अंतिम फेरी गाठली. शिवशक्तीच्या तेजश्री चौगुले, गार्गी विचारे, साधना विश्वकर्मा यांना दुसऱ्या डावात आपल्या खेळात सातत्य राखणे जमले नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात डॉ. शिरोडकरने महर्षी दयानंदचा ४३-१६असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली. धनश्री पोटलेच्या झंजावाती चढायांनी दयानंदचे क्षेत्ररक्षण खिळखिळे करून टाकले. तिला थोपविणे त्यांना जमले नाही. या डावात धनश्रीने दोन वेळा एका चढाईत ४-४गडी गारद केल्यामुळे डॉ. शिरोडकरने पहिल्या डावात ३०-०२अशी भक्कम आघाडी घेतली होती. धनश्रीला या विजयात स्नेहा गुप्ता, साक्षी पवार यांनी चढाई-पकडीची उत्तम साथ दिली. महर्षी दयानंदच्या श्रुती शेडगे, गौरी बिरमोळे यांना उत्तरार्धात सूर सापडला. पण तोपर्यंत सामना हातून निसटला होता.