आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईवर ६ गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. दिल्लीच्या विजयाचा नायक अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा ठरला. या विजयानंतर अमित मिश्राने आयपीएलचे इतिहासातील सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होण्याविषयी एक महत्त्वपूर्ण विधान केले.
मिश्राची अप्रतिम गोलंदाजी
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने वेगवान गोलंदाज लुकमन मेरीवालाला वगळून मिश्राला संधी दिली. त्याने कर्णधाराला निराश न करता रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, ईशान किशन व कायरन पोलार्ड या मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत मुंबईचा डाव १३७ पर्यंत मर्यादित ठेवला. दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान चार गडी गमावत पूर्ण केले. मिश्राला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
माझे ध्येय बळी मिळवणे
मुंबई विरुद्ध ४ बळी मिळविल्यानंतर अमित मिश्राच्या नावे आयपीएलमध्ये आतापर्यंत १५२ सामन्यात १६४ बळी झाले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा अव्वलस्थानी आहे. त्याने आयपीएलमध्ये १७० बळी आपल्या नावे केले आहेत. मात्र, त्याने मागील वर्षीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मलिंगाच्या निवृत्तीमुळे अमित मिश्राला आयपीएलचा इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची संधी चालून आली आहे. याविषयी सामन्यानंतर पृथ्वी शॉने त्याला छेडले असता, मिश्रा म्हणाला, “मलिंगाचा विक्रम तोडण्याविषयी जास्त विचार करत नाही. त्यासाठी काही योजनादेखील नाहीत. मात्र, मी सातत्याने बळी मिळवू इच्छितो. या विक्रमापर्यंत लवकरात लवकर पोहोचलो तरी चांगले आहे. परंतु संघाचा विजय माझ्यासाठी महत्त्वपूर्ण वाटतो.”
अमित मिश्राने आत्तापर्यंत खेळलेल्या आयपीएल हंगामांमध्ये केवळ तीन हंगामांत १० पेक्षा कमी बळी मिळवले आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक ३ हॅट्रिक असून, त्या तीनही हॅट्रिक तीन विविध संघांसाठी आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये केएल राहुल विराट, रोहितलाही भारी, ४ धावावंर बाद होऊनही केलाय ‘हा’ मोठा विक्रम
Video: लाईव्ह सामन्यात रिषभची सटकली; संघ सहकाऱ्याला म्हणाला, ‘शरीर मोकळं सोडून खेळ जरा’
“…म्हणून एमएस धोनी घेऊ शकतो थोडी विश्रांती”, माजी दिग्गजाचे मोठी प्रतिक्रिया