नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे विजेतेपद विजय शंकरच्या नेतृत्त्वाखाली तमिळनाडू संघाने पटकावले. आता यानंतर ८ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी २०२१ या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तमिळनाडूचा २० जणांचा संघ घोषित करण्यात आला आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघात दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे पुनरागमन झाले आहे. हे दोघेही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत.
वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड दौऱ्यावेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. तसेच कार्तिकही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. दरम्यान, कार्तिक मागील महिन्यात जुळ्या मुलांचा वडील बनला असल्याने मिळालेल्या विश्रांतीच्या काळात त्याला त्याच्या नवज्यात मुलांबरोबर वेळ घालवता आला आहे. कार्तिकने क्रिकेट खेळण्याबरोबरच यावर्षी समालोचन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
तमिळनाडू क्रिकेट निवड समीतीने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी विजय शंकरकडेच कर्णधारपदाची धूरा कायम ठेवली आहे. याशिवाय या संघात शाहरुख खान, एन जगदिशन, सी हरी निशांत, आर साई किशोर, मुरुगन अश्विन, संदीप वॉरियर अशा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.
ही स्पर्धा ८ डिसेंबरपासून २७ डिसेंबरपर्यंत होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ३८ संघ सहभागी होणार आहेत.
विजय हजारे ट्रॉफी २०२१ साठी तमिळनाडू संघ –
विजय शंकर (कर्णधार), एन जगदीशन, दिनेश कार्तिक, सी हरी निशांत, शाहरुख खान, आर साई किशोर, मुरुगन अश्विन, संदीप वॉरियर, वॉशिंग्टन सुंदर, एम सिद्धार्थ, बी साई सुदर्शन, व्ही गंगा श्रीधर राजू, एम मोहम्मद, जे कौसिक, पी सरवण कुमार, एल सूर्यप्रकाश, बाबा इंद्रजीत, आर संजय यादव, एम कौशिक गांधी, आर सिलांबरसन.
महत्त्वाच्या बातम्या –
विहारीने काय चूक केली? दिग्गजाने निवडसमितीवर ओढले ताशेरे
बीसीसीआय सुधारणार बिहार क्रिकेटची दशा; ‘या’ दोघांवर सोपवली जबाबदारी
गेल-ब्राव्हो पुन्हा दाखवणार आयपीएलमध्ये जलवा