नागपूर, 9 जून 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या अकराव्या फेरीत अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज विरुध्द अंत्यत चुरशीच्या लढतीत बरोबरी साधताना तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एस याने विजेतेपद संपादन केले.
नागपूरमधील नैवेद्यम नॉर्थस्टार संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत केवळ 18 वर्षीय रोहित कृष्णा याने अपराजित राहताना 7 विजय, आणि 4 बरोबरीसह एकुण 9गुणांची कमाई करताना दुसऱ्या स्थानावरील खेळाडूंपेक्षा संपुर्ण एका गुणाने आघाडी राखली. तब्बल सहा खेळाडूंनी प्रत्येकी 8गुण मिळवताना संयुक्त दुसरे स्थान निश्चित केले. टायब्रेकर अखेर संयुक्त दुसऱ्या स्थानावरील खेळाडूंची क्रमवारी अशी आहे. ग्रँडमास्टर आर आर लक्ष्मण, व्ही एस राहुल, ग्रँड मास्टर अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज, वियानी अँटोनिओ, कुशाग्र मोहन व नीलाश शहा. दुसऱ्या पटावर झालेली आर आर लक्ष्मण विरुध्द वियानी अँटोनिओ यांच्यातील लक्षवेधी लढत बरोबरीत सुटली. हे दोघेही रोहित पेक्षा एका गुणाने पिछाडीवर होते व रोहितला पराभव पत्करावा लागला असता तर त्यांना विजेतेपदाची संधी होती.
रेटी पद्धतीच्या ओपनिंग नंतर लक्ष्मण आणि वियानी या दोघांनीही नियमित अंतराने एकमेकांची मोहरी मारताना सावध खेळ केला. डावाच्या अखेरीस दोघांकडेही राजा, दोन किरकोळ मोहरी व प्यादी शिल्लक असल्यामुळे 30व्या चालीला दोघांनीही बरोबरी मान्य केली. विजय मिळवल्यास मला विजेतेपदाची संधी होती. परंतु संपुर्ण डावात तशी संधी मिळाली नाही, असे वियानी याने सांगितले. तर पटावरील स्थिती पाहता विजयासाठी प्रयत्न करणे शक्य नव्हते अशी कबुली लक्ष्मण याने दिली.
अन्य एका लढतीत तेलंगणाच्या कुशाग्र मोहन याने अनुभवी ग्रँडमास्टर फेडोरोव्ह अॅलेक्सी याच्यावर सनसनाटी मात केली. वजीराच्या बाजूला कॅसलिंग केल्यानंतर फेडोरोव्ह च्या राजावर कुशाग्रने योजनाबद्ध आक्रमण केले. फेडोरोव्हने केलेल्या दोन चुकांमुळे त्याचा राजा कोंडीत सापडला. त्यातच कुशाग्रने पटाच्या मध्यावरून पुढे नेलेली दोन प्यादी हत्ती, वजीर व घोडे यांच्या साहाय्याने केलेल्या आक्रमणासमोर फेडोरोव्हने 34व्या चालीला शरणागती पत्करली. एका सुरेख विजयाने स्पर्धेचा समारोप झाल्याचा आनंद कुशाग्र मोहन याने व्यक्त केला.
स्पर्धेतील विजेत्या रोहित कृष्णा एस याला करंडक व ३,५०,००० रुपये तर, उपविजेत्या लक्ष्मण आर आर याला करंडक व २,७५,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत कुंटे व गिरीश व्यास, खजिनदार विलास म्हात्रे, अंकुश रक्ताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय कपूर म्हणाले की, विदीत आणि रौनक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवी असलेल्या ग्रॅण्डमास्टर्स शॉर्ट आणि स्विडलर यांच्यावर वर्चस्व राखले. यावरूनच भारत बुद्धिबळात ताकदवान देश होण्याच्या मार्गावर आहे हे सिद्ध होते आणि तो दिवस दूर नाही. देशातील बुद्धिबळ गुणवत्ता बघता भारतातूनही पुन्हा एकदा विश्वविजेता निर्माण होईल यात शंका नाही.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:अकरावी फेरी:(व्हाईट व ब्लॅक या नुसार):
अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(बेलारूस)(8गुण) बरोबरी वि.रोहित कृष्णा एस(भारत)(9गुण)
लक्ष्मण, आर.आर.(भारत)(8गुण)बरोबरी वि.वियानी अँटोनियो डिकूना(भारत)(8गुण)
कुशाग्र मोहन(भारत)(8गुण) वि.वि.फेडोरोव्ह अॅलेक्सी(बेलारूस)(7गुण)
राहूल व्हीएस(भारत) (8गुण) वि.वि.सेपर मिलोझ(पोलंड)(7गुण)
मयंक चक्रवर्ती(भारत)(7गुण) पराभुत वि.नीलाश साहा (भारत) (8गुण)
संकेत चक्रवर्ती(भारत) (7.5गुण) वि.वि.सावचेन्को बोरिस(रशिया) (6.5गुण)
वेदांत पानेसर(भारत)(7गुण) बरोबरी वि.झाकरसेव्ह वायचेसलाव्ह (7गुण)
राजेश नायक(भारत)(6.5गुण) पराभुत वि.लुका पैचाज(जॉर्जिया)(7.5गुण)
दिपसेन गुप्ता(पीएसपीबी)(7गुण) बरोबरी वि.शुभयन कुंडू(भारत)(7गुण)
रित्विज परब(भारत)(7.5गुण) वि.वि.एवेग्नि वोरोबिव्हो(रशिया)(6.5गुण)
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश