प्रो कबड्डीमध्ये काल नागपूर मुक्कामात शेवटचा सामना बेंगलुरु बुल्स आणि तमिल थालयइवाज या संघामध्ये झाला. हा सामना तमिल थालयइवाजने २९-२४ असा जिंकला. या सामन्यात बेंगलुरु बुल्सचा कर्णधार असणाऱ्या रोहित कुमारने ११ गुण मिळवत चांगली कामगिरी केली परंतु त्याची ही कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या उलट तमिल थालयइवाजने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवत हा सामना जिंकला आणि प्रो कबड्डीमधील पहिल्या विजयाची नोंद केली.
पहिल्या सत्राला सुरुवात झाली आणि पहिल्याच रेडमध्ये तामिलच्या के. प्रपंजनने गुण मिळवला. या यानंतर बेंगलुरु बुल्सच्या अजय कुमारने डु ऑर डाय रेडमध्ये गुण मिळवला. १२व्या मिनिटांपर्यंत सामना ५-५ असा बरोबरीत होता. त्यानंतर रोहित कुमारने उत्तम रेडींगचे प्रदर्शन करत सामना बेंगलुरु बुल्सच्या बाजूने झुकवला. तामिलच्या संघाचा शेवटचा खेळाडू डी. प्रदीप बाकी होता तो रेडवर आला आणि त्याने बेंगलुरु बुल्सच्या खेळाडूला बाद केले आणि या क्षणापासून तामिलचा संघ सामन्यात परतला. पुढील काही मिनिटात डिफेन्स करत त्यांनी बेंगलुरु बुल्सच्या खेळाडूंना बाद केले. पहिले सत्र संपले तेव्हा बेंगलुरु बुल्सच्या संघाचे दोनच खेळाडू मैदानात राहिले आणि तामिल संघ सामन्यात १२-८ असा आघाडीवर पोहचला.
दुसऱ्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला बेंगलुरु बुल्सचा संघ ऑल आऊट झाला आणि तमिल संघाची बढत १६-९ अशी झाली. यानंतर बेंगलुरु बुल्सने सामन्यात परतण्याचे प्रयत्न चालू केले. रोहितने यशस्वी रेडचा सपाट चालू केला आणि आपले सुपर टेन पूर्ण करत दुसऱ्या सत्रात १३व्या मिनिटाला तामिल संघाला ऑल आऊट केले. या ऑल आऊट नंतर सामन्यातील गुण फलक २१-२० असा झाला. पुढील मिनिटांमध्ये तामिल संघाने संयमी खेळ केला. त्यांनी घेतलेले रीव्हीव यशस्वी ठरले. रोहीतकुमार आणि अजयकुमार यांना गुण मिळवण्यात अपयश आले. शेवटी हा सामना तमिल संघाने जिंकला.
पहिला गुण मिळवल्यानंतर अजयकुमार पूर्ण सामन्यात एकही गुण मिळवू शकला नाही. बेंगलुरु बुल्सच्या पराजयाचे हे एक मोठे कारण आहे. तमिल संघाचा प्रो कबड्डीमधील हा पहिलाच विजय ठरला आहे. पराभूत होऊनही ७ सामन्यात २० गुणांसह बेंगलुरु बुल्स ‘झोन बी’ मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.