आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत २० संघ खेळत आहेत. यामध्ये अनेकांचे जन्मस्थान वेगळा देश असून स्पर्धेत ते प्रतिनिधित्व एका वेगळ्याच संघाचे करत आहेत. अशाच एका खेळाडूबाबत आपण जाणून घेऊया, ज्याने पंजाब सोडले. नंतर टॅक्सी चालवली आता तो टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.
ईटलीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत सिंग. तो वयाच्या १०व्या वर्षीच आपले पंजाबमधील फगवाडा हे शहर सोडून ईटलीला स्थायिक झाला. जसप्रीतने त्याच्या ईटलीतील प्रवासाबाबत बोलताना म्हटले, “जेव्हा आम्हाला ईटलीला जायला मिळाले, तेव्हा आम्ही खूप खूष होतो. एक चिंता मात्र होती मी क्रिकेट कसे खेळणार,कारण मी आपल्या शहरात लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो आहे.”
ईटली म्हटले की क्रिकेटचा फारसा संबंध न असलेला देश. अशा या देशात जाणे जसप्रीतसाठी सोपे नव्हते. त्यामुळे त्याने स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये गेला. त्यादरम्याने त्याने वडीलांच्या मदतीने दोन वर्षात इलेक्ट्रीशियनचा कोर्सही पूर्ण केला. नंतर त्याला काही भारतीय प्रवाशांकडून पुढची मदत मिळाली. त्यांनी त्याला इंग्लंडमध्ये जाण्यास सांगितले. त्याने बर्मिंघममध्ये जाऊन क्रिकेटचा सराव करताना खर्च पुरण्यासाठी उबेरच्या ड्रायव्हरची नोकरी केली.
जसप्रीत म्हणाला, “मी लहान होतो, तेव्हा मी भारतात क्रिकेट खेळत होते आणि ईटलीला जाऊनही मला तेच करायचे होते. मात्र जेव्हा तेथे गेलो तेव्हा तेथे क्रिकेट नव्हते, कोणते स्टेडियम किंवा मैदान नव्हते, जसे मी पंजाबमध्ये पाहिले आहे.”
जसप्रीतने बर्मिंघममध्ये जाऊन स्टेट प्रीमियर लीग खेळली. त्यानंतर त्याची ईटलीच्या संघात निवड झाली आणि २०१९मध्ये त्याने नॉर्वेविरुद्ध पदार्पण केले. २०२४च्या टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही ते अगदी जवळ पोहोचले होते, मात्र आर्यलंडकडून त्यांचा पराभव झाला. यंदा मात्र ईटलीने पात्रता फेरीत अव्वल स्थानावर राहत टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले.
क्रिकेट ते पण आपल्या मायदेशात खेळताना कसे वाटत आहे असे विचारताच जसप्रीत म्हणाला, “हा आमच्यासाठी सर्वात मोलाचा क्षण आहे. मी लहानपणापासून ही मैदाने पाहिली आहे. येथे कपिल देव,सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांसारखे दिग्गद क्रिकेटपटू खेळले आहेत.”
“येथे येऊन खेळणे ते पण चिदंबरम स्टेडियम, ईडन गार्डन्स आणि वानखेडे स्टेडियम सारख्या ठिकाणी. हे एक स्वप्नासारखेच आहे,” असेही जसप्रीतने पुढे म्हटले आहे.
या स्पर्धेत ईटलीचा पहिला सामना ९ फेब्रुवारीला स्कॉटलंड विरुद्ध आहे. हा सामना कोलकातामध्ये खेळला जाणार आहे.






