ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर आता 330 हून अधिक धावांचं लक्ष्य असेल. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कांगारुंकडे 333 धावांची आघाडी आहे.
तसं पाहिलं तर 330 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं ही टीम इंडियासाठी नवीन गोष्ट नाही. टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी 320 हून अधिक धावांचं लक्ष्य तीनदा गाठलं आहे. भारतानं शेवटच्या वेळी 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 328 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीनं भारताला खूप त्रास दिला. त्यांनी शेवटच्या सत्रात सुमारे 18 षटकं खेळली. नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
टीम इंडियानं यापूर्वी चौथ्या डावात तीनदा 300 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं आहे. यापैकी दोनवेळा भारतानं विदेशी भूमीवर ही कामगिरी केली. भारतानं याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदा ही कामगिरी केली आहे. कसोटीत भारतानं चौथ्या डावात सर्वाधिक धावा वेस्ट इंडिजविरुद्ध चेज केल्या आहेत. 1976 मध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडीजविरुद्ध 403 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. यानंतर भारतानं 2009 मध्ये इंग्लंड विरुद्ध 387 धावा, 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 328 आणि 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडीज विरुद्ध 276 धावा चेज केल्या आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथनं पहिल्या डावात शतक झळकावलं, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकं झळकावली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात एकूण 474 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं भारतासाठी चार विकेट घेतल्या. भारतीय संघ पहिल्या डावात थोडा गडबडला, परंतु नितीश रेड्डीच्या शतकाच्या जोरावर संघाला 369 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं. भारासाठी यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकं केली.
ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चौथ्या दिवशी 9 विकेट गमावून 228 धावा केल्या आहेत. कांगारुंची शेवटची जोडी अजूनही नाबाद आहे. ते पाचव्या दिवशी फलंदाजी करतील. यानंतर भारताला लक्ष्य मिळेल. ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्नस लाबुशेननं अर्धशतक झळकावलं, तर कर्णधार पॅट कमिन्सनं 41 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात पुन्हा 4 आणि मोहम्मद सिराजनं 3 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
‘मास्टरमाइंड’ कोहलीनं मिळवून दिली सिराजला विकेट, एक सल्ल्यानं सामन्याचं चित्र पालटलं!
भारताच्या विजयाला ‘ग्रहण’, ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 पार; अखेरच्या सत्रात बुमराह-सिराजची मेहनत वाया
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य