पुढील महिन्यात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या ६ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात अली आहे. या मालिकेत विराट कोहलीने विश्रांती नंतर कर्णधार म्हणून पुनरागमन केले आहे. तसेच शार्दूल ठाकूर या मुंबईकर गोलंदाजाला संधी देण्यात अली आहे.
मात्र मागच्या काही वनडे मालिकेप्रमाणे याही वनडे मालिकेत आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची निवड करण्यात आलेली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी यो यो फिटनेस टेस्ट यशस्वी पार केलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनाही संधी दिलेली नाही.
भारतीय संघात जडेजा आणि अश्विन ऐवजी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केलेल्या श्रेयश अय्यरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. चहल आणि कुलदीप बरोबर अक्षर पटेलचीही निवड झाली आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३ कसोटी, ६ वनडे आणि ३ टी २० सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पुढील महिन्यात ५ जानेवारी पासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर १ फेब्रुवारीपासून वनडे मालिका सुरु होईल.
असा आहे वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयश अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम एस धोनी(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.