चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं बांगलादेशचा 230 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 515 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ 280 धावांवर गारद झाला. टी20 विश्वचषकानंतर घरच्या हंगामातील भारताचा हा पहिलाच कसोटी सामना होता. या मालिकेनंतर भारत मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचंय.
तसं पाहिलं तर, भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी जिंकायची असेल, तर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत. यापैकी एका प्रश्नाचं उत्तर मिळालं, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हा प्रश्न आहे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या उत्तराधिकाऱ्यांचा.
मधल्या फळीतील या दोन फलंदाजांनी गेली अनेक वर्ष भारतीय संघाची सेवा केली आहे. मात्र 2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतर त्यांना संघात पुन्हा संधी मिळालेली नाही. पुजारा आणि रहाणेचं वय पाहता, त्यांचा भारतीय संघात कमबॅक होणं जवळपास अशक्य आहे. आता शुबमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकांनंतर भारताचा हा प्रश्न निकाली निघाला, असं म्हणता येईल.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी शुबमन गिलवर बरंच दडपण होतं. त्याची टी20 विश्वचषकासाठी निवड झाली नाही. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात त्यानं जोरदार कमबॅक केला. गिलनं एक टोक सांभाळून धरत शानदार शतक ठोकलं आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्यानं या एका खेळीनं सर्व टीकाकारांच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं आहे. चेतेश्वर पुजारानं वर्षानुवर्षे या जागेवर भारतासाठी किल्ला लढवला होता. मात्र आता गिलनं या शतकासह ही जागा आपल्या नावे केली आहे.
भारतासाठी कसोटीतील दुसरी महत्वाची जागा म्हणजे पाचव्या क्रमांकाची जागा. अजिंक्य रहाणेच्या या जागेचा प्रश्न पूर्णपणे सुटला असं तर म्हणता येणार नाही, मात्र रिषभ पंतच्या पुनरागमनानं भारताची चिंता बऱ्यास अंशी मिटली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतील दुसऱ्या डावात पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 2022 मधील कार अपघातानंतर तो प्रथमच कसोटी क्रिकेट खेळत होता. मात्र त्यानं ज्याप्रमाणे फटकेबाजी केली, ते पाहता भारतीय संघानं त्याला किती मिस केलं, हे लक्षात आलं.
पंत सामन्याच्या परिस्थितीनुसार पाचव्या किंवा सहाव्या, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. तो म्हणेल तेव्हा आक्रमक होऊ शकतो किंवा बचावात्मक पवित्रा घेऊ शकतो. हे त्यानं वेळोवेळी सिद्ध केलं आहे. पाचव्या क्रमांकावरील फलंदाजाला तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन खेळावं लागतं. पंतकडे ही कला असल्याचं देखील सिद्ध झालं आहे. त्यामुळे तो या जागेवर भारताचा सर्वोत्तम पर्याय बनू शकतो.
हेही वाचा –
580 सामने आणि 92 वर्ष! भारताच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं
अश्विनची अष्टपैलू कामगिरी, पंतचं ड्रीम कमबॅक; भारत-बांगलादेश कसोटीच्या 5 महत्वाच्या घटना जाणून घ्या
चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय; आर अश्विनचा डबल धमाका, बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!