भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारा आयसीसी टी२० विश्वचषक सुपर १२ फेरीतील २८ वा सामना ‘करा अथवा मरा’ बनला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. या सामन्याला महत्त्व प्राप्त होण्यामागचे कारण म्हणजे, हा सामना गमावणाऱ्या संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास जवळपास संपेल. कारण उभय संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे.
भारताला त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर न्यूझीलंड संघालाही धोबीपछाड देण्याची कामगिरी याच पाकिस्तान संघाने केली आहे. न्यूझीलंडने हा सामना ५ विकेट्सने गमावला होता. या पराभवांसह दोन्ही संघांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर झाला आहे. अशात जर भारतीय संघाला उपांत्य सामन्यांमधील त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. जर विराट कोहलीच्या संघाने हा सामना जिंकला तर, तो त्यांच्यासाठी ऐतिहासिक विजय ठरेल.
टी२० विश्वचषकाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास, न्यूझीलंडचे भारतावर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत हे संघ २ वेळा आमने सामने आले आहेत आणि या दोन्हीही सामन्यात केन विलियम्सनच्या पलटणने बाजी मारली आहे. यातील पहिली भिडंत २००७ टी२० विश्वचषकात झाली होती. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १० धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर २०१६ मधील टी२० विश्वचषकात दुसऱ्यांदा हे संघ एकमेकांशी भिडले होते. या सामन्यातही न्यूझीलंडने भारतावर ४७ धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. एकूणच टी२० विश्वचषकात विलियम्सनचा संघ कोहलीच्या संघावर भारी पडला आहे.
चिंताजनक बाब म्हणजे, फक्त टी२० विश्वचषक नव्हे तर आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत न्यूझीलंड संघापुढे भारताला गुडघे टेकावे लागले आहेत. भारतीय संघाने आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धेत न्यूझीलंडला शेवटचे २००३ मध्ये धूळ चारली होती. त्यानंतर न्यूझीलंडने बऱ्याचदा भारताला जेतेपद मिळवण्यापासून रोखले आहे. यामध्ये विश्वचषक २०१९ चा उपांत्य फेरी सामना आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१ चा अंतिम सामना यांचा समावेश आहे.
अशात कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडचा फडशा पाडत इतिहास रचतो की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही इथून निघून जा’, लाईव्ह शोमध्ये चॅनल होस्टकडून शोएब अख्तरचा घनघोर अपमान; पाहा व्हिडिओ
द्रविड बनणार टीम इंडियाचे २६ वे महागुरू, आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची लागलीय वर्णी; वाचा संपूर्ण यादी
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त