दोन महिने चाललेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पंधराव्या हंगामाची २९ मे रोजी अखेर झाली. यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेची तयारी करत आहे. भारतात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार असून ही मालिका ९ ते १९ जूनदरम्यान होईल.
या मालिकेतील पहिला टी२० सामना (T20 Series) जिंकत भारतीय संघाकडे (Team India) विश्वविक्रम करण्याची संधी असेल. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलग १३ सामने जिंकणारा पहिला संघ बनण्याची (Consecutive 13 T20 Matches Win) संधी भारतीय संघाकडे असेल.
उभय संघातील पहिला टी२० सामना ९ जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे सलग सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याच्या विक्रमावर लक्ष असेल. भारतीय संघाने आतापर्यंत सलग १२ टी२० सामने जिंकले आहे. यासह भारतीय संघ सध्या अफगाणिस्तान आणि रोमानिया संघांसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी२० सामना जिंकला, तर सलग १३ वा टी२० विजय त्यांच्या नावे होईल. या विजयासह भारतीय संघ सलग सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम करेल.
असे जिंकले भारतीय संघाने सलग १२ सामने
भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०२२ मधील आपला पहिला पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावला होता. त्यानंतर न्यूझीलंडनेही भारतीय संघाला पराभूत केले होते. या २ पराभवांमुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नव्हता. मात्र त्यांनी टी२० विश्वचषकातील उर्वरित ३ सामने जिंकले होते. भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबियाला पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघाने मायदेशात झालेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने सलग १२ टी२० सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
अशात आता प्रभारी कर्णधार केएल राहुल भारतीय संघाचा अजेय राहण्याचा विक्रम अबाधित राखेल की नाही? हे पाहाणे रोमांचक ठरेल.
टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२०, ९ जून, दिल्ली
दुसरी टी२०, १२ जून, कटक
तिसरी टी२०, १४ जून, विझाग
चौथी टी२०, १७ जून, राजकोट
पाचवी टी२०, १९ जून, बेंगळुरू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! रँडी ऑर्टन मोडणार जॉन सीनाचा ‘तो’ जबरदस्त विक्रम, ऑलिम्पिक विजेत्या कर्ट अँगलचा विश्वास
INDvsSA। आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर फळफळले मिलरचे नशीब; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आखला प्लॅन
वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स