भारतीय संघानं पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. आता दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी असेल. त्यापूर्वी भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
वास्तविक, संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चालू दौऱ्यातून भारतात माघारी परतला आहे. गंभीरनं वैयक्तिक कारण सांगून मायदेशी परतण्यासाठी बोर्डाकडे परवानगी मागितली होती, जी मान्य करण्यात आली. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, दुसरी टेस्ट सुरू होण्यापूर्वी गंभीर पुन्हा भारतीय संघात सामील होईल.
गंभीर संघासोबत नसला तरी भारतीय संघ शनिवारपासून कॅनबेरा येथे गुलाबी चेंडूनं दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी बुधवारीच संघ कॅनबेराला रवाना होईल. गंभीरच्या अनुपस्थितीत कोचिंग स्टाफचे इतर सदस्य संघाची काळजी घेतील. चांगली बातमी म्हणजे, कर्णधार रोहित शर्माही संघात सामील झाला आहे. रोहित रविवारीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला. तो पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये दिसला होता. रोहितनं पर्थला पोहोचताच सरावाला सुरुवात केली आहे.
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून भारतीय संघचा फॉर्म चढ-उतारानं भरलेला राहिलाय. भारतानं तब्बल 20 वर्षांनंतर श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली. मात्र या दौऱ्याची सुरुवातील टीम इंडियानं टी20 मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला होता. यानंतर भारतीय संघानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी गमावली. या मालिकेतील पराभवानंतर गंभीरवर बरीच टीका झाली होती. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 12 वर्षांपासून भारतानं घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतानं आता ऑस्ट्रेलियात पोहोचताच पहिल्या कसोटीत यजमानांचा दारुण पराभव केला आहे.
हेही वाचा –
आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही
अखेर अर्जुन तेंडुलकरवर बोली लागली! सुरुवातीला राहिला होता अनसोल्ड
काय होतास, काय झालास! मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड, एकेकाळी सचिनशी व्हायची तुलना!