न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. गंभीरच्या कामगिरीवर बीसीसीआयची नजर असून ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गंभीरचं भविष्य ठरवेल. याशिवाय त्याचे काही अधिकारही काढून घेतले जाऊ शकतात.
गौतम गंभीरनं जेव्हापासून भारतीय संघाची धुरा सांभाळली, तेव्हापासून संघ लज्जास्पद विक्रम करत आहे. भारताला प्रथमच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. याआधी भारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही गमावली होती. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा ऑस्ट्रेलिया दौरा खराब गेला, तर बीसीसीआय महत्त्वाचं पाऊल उचलू शकते.
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यातील दोन मालिका ऑस्ट्रेलियात झाल्या होत्या. अशा परिस्थितीत गौतम गंभीरला आपली स्थान कामय ठेवायचं असेल, तर त्याला ही कसोटी मालिका जिंकावीच लागेल. जर भारतीय संघानं कसोटी मालिका 4-1 किंवा 5-0 ने जिंकली तरच ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचू शकतात.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीरला पूर्वीचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांच्यापेक्षा जास्त अधिकार मिळाले आहेत. गंभीर संघ निवडीबाबत बोलू शकतो, जे अधिकार शास्त्री आणि द्रविड यांना नव्हते. एवढेच नव्हे तर, एका रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, गौतम गंभीरच्या सूचनेनुसारच मुंबईतची खेळपट्टी फिरकीला अनुकूल बनवण्यात आली होती. मात्र या जाळ्यात भारतीय फलंदाजच अडकले आणि संघ 25 धावांनी पराभूत झाला.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, मुख्य प्रशिक्षकांची निवड प्रक्रियेत कोणतीही भूमिका नसते. परंतु बोर्डानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी वेगळा निर्णय घेतला. या दौऱ्याचं महत्त्व लक्षात घेऊन गंभीरला निवड समितीच्या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं पीटीआयला सांगितलं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं महत्त्व लक्षात घेऊन गौतम गंभीरला निवड समितीच्या बैठकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. गंभीरनं रोहित शर्माच्या टी20 मधील निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्याच्या व सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा –
सोप्पं नाही भाऊ! केविन पीटरसनने टीम इंडियाला असं केलं ट्रोल
रोहित शर्मा फलंदाजीत फ्लॉप का होतोय? माजी खेळाडूनं कारण सांगितलं, म्हणाला…
विराट-रोहितला कसोटीतून ड्रॉप करण्याची वेळ आली आहे का? आकडेवारी जाणून घ्या