ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाकडे एक अनोखा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी देखील आहे.
भारतीय संघाने जर इंग्लंडविरुद्ध 2 सामन्यात विजय मिळवला तर ते एकविसाव्या शतकात 100 कसोटी विजय पूर्ण करतील. भारत असे करण्यात यशस्वी ठरला तर तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका नंतरचा चौथा संघ ठरेल. भारताने 2000 नंतर आतापर्यंत 216 कसोटी सामने खेळलेले आहेत. यात भारताला 98 विजय व 59 पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच 59 सामने अनिर्णित राहिलेले आहेत.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.
भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू शेतकऱ्यांचा नायक आहेस’, क्रिकेटपटू संदीप शर्माचे होतेय कौतुक; ‘हे’ आहे कारण
चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटीत धूळ चारणारा भारतीय धुरंधर, नाव आहे ‘पंकज रॉय’
Video : बिग बॅश लीगमध्ये तब्बल ३ वेळा करण्यात आला टॉस, कारण आहे फारच मजेशीर