टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 टी20 विश्वचषक जिंकला. 29 जून रोजी ब्रिजटाऊन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय चाहत्यांच्या नजरा पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर खिळल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही? हा सर्वात मोठा मुद्दा आहे.
आता चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित एक मोठं अपडेट समोर आलं आहे. माहितीनुसार, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकारनंच घ्यायचा आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आयसीसीला सादर केलेल्या मसुद्यात भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं, “आम्ही अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल काहीही चर्चा केलेली नाही. परंतु मला वाटतं की भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय भारत सरकार घेईल. या महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत पीसीबी हा मुद्दा नक्कीच उपस्थित करेल.”
सूत्रानं सांगितलं की, “सरकार जो निर्णय घेईल त्याचं पालन केलं जाईल. ही आयसीसीची स्पर्धा आहे. आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आयसीसीच्या पुढील बैठकीत याबाबत काही माहिती समोर येऊ शकते. गेल्या वर्षी आशिया कपचं आयोजनही पाकिस्तात करण्यात आलं होतं. तेव्हाही बीसीसीआयनं आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीला ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आशिया कप आयोजित करावा लागला. आता पाकिस्तानला भीती आहे की, आशिया चषक प्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी देखील ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आयोजित करावी लागेल. जर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही, तर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सामने यूएई किंवा श्रीलंकेत हलवले जाऊ शकतात.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गेल्या वर्षी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. तसेच अलीकडेच भारतीय टेनिस संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी हिरवा कंदील मिळाला होता. त्यानंतर क्रिकेट संघाला देखील पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळेल, असं बोललं जात होतं.
भारतीय संघानं शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर आशिया कप खेळला होता. या स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, जिथे संघाचा श्रीलंकेकडून 100 धावांनी पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या विक्ट्री परेडनंतर मुंबईकरांचे हाल, मरीन ड्राइव्हवरून निघाला तब्बल इतके किलो कचरा!
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंना तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!