पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यापूर्वी 2020 टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरलं होतं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 7 पदकं जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडू हा आकडा पार करतील, अशी अपेक्षा आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा पाच खेळांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये भारत पदक जिंकणार हे जवळपास निश्चित आहे.
(1) भालाफेक – यापूर्वी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं भालाफेकीत सुवर्णपदक जिंकलं होते. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं भारतासाठी हे सुवर्णपदक जिंकलं होतं. गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. स्पर्धेपूर्वी तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत नीरज या ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
(2) बॅडमिंटन – स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं आतापर्यंत 2 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. ती दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. आता पीव्ही सिंधूकडून पुन्हा एकदा बॅडमिंटनमध्ये पदक मिळवण्याची अपेक्षा असेल.
(3) गोल्फ – भारताची स्टार गोल्फर अदिती अशोककडून यावेळी पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीचं पदक थोडक्यात हुकलं होतं. ती चौथ्या स्थानावर राहिली होती. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडिया’चे नवनियुक्त अध्यक्ष कपिल देव यांनी अदिती अशोक पदक जिंकण्याबद्दल बोलले आहेत. त्यामुळे यंदा तिच्याकडून अपेक्षा जास्त वाढल्या आहेत.
(4) बॉक्सिंग – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळू शकतात. स्टार बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेननं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं होतं. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 75 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या लोव्हलिनाकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. याशिवाय ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेली स्टार निखत जरीन देखील भारताला पदक मिळवून देऊ शकते. निखत 50 किलो वजनी गटात पात्र ठरली आहे.
(5) वेटलिफ्टिंग – टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतानं वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकलं होते. मीराबाई चानूनं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होतं. यावेळीही मीराबाई चानूकडून पदकाची अपेक्षा आहे.
हेही वाचा –
शुबमन गिलचं प्रमोशन! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटी संघातही मिळू शकते मोठी जबाबदारी
नीता अंबानींची पुन्हा एकदा आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड
पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा