काहीवर्षांपूर्वी टी२० क्रिकेटला सुरुवात झाली. आधी या क्रिकेट प्रकाराकडे तिरकस नजरेनं पाहाणारा भारत काहीवर्षातच या प्रकाराच्या प्रमातही पडला. टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची वाटचाल ही एका रोलर कोस्टर राईडसारखी राहिली आहे. आतापर्यंत टी२० चषक हा ६ वेळेस खेळण्यात आला आहे आणि सर्व ६ स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हे दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने केले आहे.
भारताने टी२० विश्वचषकात आता पर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. त्यात २० सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे व ११ सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. १ सामना बरोबरीत आणि १ सामना रद्द झाला आहे. भारतीय संघाचा विजयी टाकेवारी ही ६४.०६% राहिली आहे. तसेच भारताने २००७ साली झालेला पहिलाच टी२० विश्वचषक जिंकला आहे. चला जाणून घेऊ या भारतीय संघाचा टी२० विश्वचषकामधील प्रवास
टी२० विश्वचषक २००७ : या पहिल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघ हा एक नवीन आणि युवा कर्णधार महेंद्रसिंग धोनी समवेत उतरला होता. या विश्वचषकात धोनी पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करत होता. त्याने त्यावेळी फक्त स्वतःला सिद्ध नाही केले तर कर्णधार म्हणून भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकून देत एक इतिहास रचला होता. भारताचा प्रथम सामना हा स्कॉटलंड विरुद्ध होता. त्यात पावसाने अडथळा घातल्याने तो सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत झाला व या रोमांचक सामन्यात भारताने विजय मिळवून विश्वचषकात आपला पहिला विजय नोंदवला.
पाकिस्तान सोबत झालेल्या हा सामना निर्धारित २०-२० षटकांनंतर बरोबरीत संपला होता. त्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार बॉलटने विजयी संघ ठरणार होता. यात भारतीय संघाने बाजी मारली. या नंतर सुपर ८ लीगमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पण, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड संघाविरुद्ध विजय मिळवत भारताने उपांत्यफेरीची पायरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघावर मात करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आणि २४ सप्टेंबरला जोहान्सबर्ग येथे पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करुन आपल्या पहिल्या टी२० विश्वचषकावर भारताने नाव कोरले.
टी२० विश्वचषक २००९ : हा विश्वचषक इंग्लंडमध्ये झाला होता, जो पाकिस्तान संघाने जिंकला होता. टी२० विश्वचषक २००९ भारतीय संघासाठी हे वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. धोनीच्या नेतृत्वात भारत वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाकडून सलग तीन सामने गमावल्यानंतर या स्पर्धेतून बाद झाला. २००९ च्या विश्वचषकात भारताचा एकमेव विजय आयर्लंडविरुद्ध होता.
टी२० विश्वचषक २०१०: वेस्ट इंडीजने आयोजित केलेला टी२० विश्वचषक २०१० इंग्लंडच्या संघाने जिंकला. या विश्वचषकामध्ये भारताने चांगली सुरुवात केली होती. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभूत केले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भारताला या टी२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
टी२० विश्वचषक २०१२: डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघाने यजमान श्रीलंकेला हरवून टी२० विश्वचषक जिंकला. टी२० विश्वचषक २०१२ मध्ये भारताची कामगिरी मागील दोन विश्वचषकांपेक्षा चांगली होती. या विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. धोनीच्या संघाने अफगाणिस्तान, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. पण निव्वळ नेट रनरेटच्या जोरावर भारतीय संघ टी२० विश्वचषक २०१२ च्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवू शकला नाही.
टी२० विश्वचषक २०१४: एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी२० विश्वचषक २०१४ चा अंतिम सामना खेळला. बांगलादेशच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला सहा विकेट्सने पराभूत केले होते. टी२० विश्वचषक २०१४ मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्याखेरीज इतर सर्व सामने जिंकले होते. या विश्वचषकात विराट कोहली हा मालिकावीर ठरला होता.
टी२० विश्वचषक २०१६: एमएस धोनीचा हा अखेरचा टी२० विश्वचषक होता. टी२० विश्वचषक २०१६ साली भारतात आयोजित करण्यात आला होता, जो वेस्ट इंडीज संघाने जिंकला होता. या विश्वचषकात भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु त्यानंतर भारतीय संघाने उर्वरित सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. याच विश्वचषकात साखळी फेरी भारताने बांगलादेशला केवळ १ धावेने पराभूत केले होते आणि उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत भारताला वेस्ट इंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या विश्वचषकामध्येही विराट कोहली मालिकावीर होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीव्हीवर ‘त्या’ गोलंदाजाला पाहून वॉर्नरची उडाली झोप; म्हणाला, ‘झोपण्याच्या प्रयत्नात होतो आणि…’
वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?
जेव्हा तब्बल ४२ चौकारांसह विवियन रिचर्ड्स यांनी ठोकले होते तुफनी त्रिशतक, वाचा त्या खास खेळीबद्दल