ड्रीम 11: फक्त कन्यारत्नं असलेल्या क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे रोहित शर्मा, सुरेश रैना, एमएस धोनी अशा कन्यारत्नं असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये रहाणेचाही आता समावेश झाला आहे.

मागील 10 वर्षांमध्ये क्रिकेट खेळलेल्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंना फक्त मुली आहेत. ज्यांना मुलगा नाही. आशा क्रिकेटपटूंचा एक 11 जणांचा संघ होऊ शकतो तो असा –

1 – रोहित शर्मा – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने स्पोर्ट्स मॅनेजर असणाऱ्या रितिका सजदेह बरोबर 2015 मध्ये विवाह केला. त्यानंतर त्यांना 30 डिसेंबर 2018 ला एक मुलगी झाली. तिचे नाव समायरा असे ठेवले आहे. ती 2019 च्या आयपीएलदरम्यान रोहित कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांना रितिकाबरोबर उपस्थित होती.

2. गौतम गंभीर – मागीलवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केलेल्या गंभीरने नताशा जैनबरोबर 2011 मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली असून मोठ्या मुलीचे नाव अझीन आहे, तर अनायझा असे छोट्या मुलीचे नाव आहे. तो अनेकदा त्याच्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

3. चेतेश्वर पुजारा – भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला एक मुलगी आहे. त्याने पुजा पाबरीबरोबर फेब्रुवारी 2013ला लग्न केले असून या दोघांना 22 फेब्रुवारी 2018 ला मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी आदिती असे ठेवले आहे. ती नुकत्याच विशाखापट्टणमला पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी पुजाबरोबर स्टेडियममध्ये उपस्थित होती.

4. सुरेश रैना – भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनालाही एक मुलगी असून तो अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. रैनाने 3 एप्रिल 2015 ला बालमैत्रीण प्रियांका चौधरीबरोबर विवाह केला होता.

त्यानंतर त्यांना 14 मे 2016 ला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी ग्रासिया ठेवले असून तिचा जन्म नेदरलँड्सची राजधानी अँम्स्टरडॅमला येथे झाला. तिच्या जन्मावेळी रैना आयपीएलमधील काही सामन्यांमधून विश्रांती घेत अँम्स्टरडॅमला गेला होता.

5. अजिंक्य रहाणे – कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले असून अजून त्याने तिचे नाव काय ठेवले आहे, याचा खूलासा केलेला नाही. रहाणेने त्याची बालमैत्रीण राधिका धोपवकरबरोबर 26 सप्टेंबर 2014 ला विवाह केला होता.

6. एमएस धोनी – भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 4 जूलै 2010ला साक्षी रावतबरोबर विवाह केला. साक्षीने 6 फेब्रुवारी 2015 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मावेळी धोनी 2015 च्या विश्वचषकामध्ये व्यस्त होता. त्यामुळे तो जवळजवळ 2 महिने त्याच्या नवजात मुलीला भेटला नव्हता.

त्याच्या मुलीचे नाव झीवा असून तिचे इस्टाग्रामवर अकाउंटही आहे. या अकाउंटला हजारो फॉलोवर्स आहेत. झीवा अनेकदा आयपीएलवेळी साक्षीसह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.

7. केदार जाधव – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव आणि त्याची पत्नी स्नेहल जाधवला एक मुलगी असून तिचे नाव मिरया आहे. केदार अनेकदा त्याच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

8 – रविंद्र जडेजा – भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने रिवा सोळंकीबरोबर एप्रिल 2016मध्ये विवाह केला होता. या पती-पत्नीला 8 जून 2017 मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव जडेजाने निध्याना असे ठेवले आहे.

तिच्या जन्मावेळी जडेजा 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यस्त होता. या स्पर्धेनंतर भारतीय संघाबरोबर तो थेट इंग्लंडहून वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी गेल्याने त्याने त्याच्या मुलीला जवळजवळ 1 महिन्याने पहिल्यांदा पाहिले होते.

9. आर अश्विन – भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनला दोन मुली आहेत. अश्विनने त्याची बालमैत्रीण प्रीती नारायणबरोबर 13 नोव्हेंबर 2011 ला विवाह केला. या उभयांतांना 11 जूलै 2015 ला पहिली मुलगी झाली. तर डिसेंबर 2016 ला प्रीतीने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव अखिरा असून लहान मुलीचे नाव आध्या आहे.

10. हरभजन सिंग – भारताचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने अभिनेत्री गिता बसराबरोबर 2015 मध्ये विवाह केला. या दोघांना 27 जूलै 2016ला कन्यारत्न झाले. त्यांच्या मुलीचे नाव हिनाया हिर प्लाहा असून हरभजन अनेकदा तिचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

11. मोहम्मद शमी –  भारताचा वेगवान गोलंदाज शमीला आयरा नावाची लहान मुलगी आहे. तो अनेकदा तिचे डान्स करतानाचे, खेळतानाचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

You might also like