जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बुधवारी (7 जून) सुरुवात झाली. लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ या सामन्यात चार वेगवान गोलंदाज व एका फिरकीपटूसह उतरला. आपण पाहूया या सामन्यात भारतीय संघाने कशी प्लेईंग इलेव्हन उतरवली आहे.
सलामीवीर- भारतीय कर्णधार रोहित शर्मा व सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेला शुबमन गिल या महत्वपूर्ण सामन्यात भारतीय संघासाठी सलामी देतील.
मधली फळी- भारतीय संघाची मधली फळी यादरम्यान सर्वाधिक अनुभवी दिसून येते. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा फलंदाजीला येईल. तो काही दिवसांपासून इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळत असल्याने त्याचा फायदा संघाला होईल. तर चौथ्या क्रमांकावर सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली हा उतरणार आहे. तर पाचव्या क्रमांकावर जवळपास दीड वर्षांनी पुनरागमन करत असलेला अजिंक्य रहाणे दिसून येईल. या तिघांना इंग्लंडमध्ये प्रत्येकी तीन कसोटी मालिका खेळण्याचा अनुभव आहे.
यष्टीरक्षक- या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून केएस भरत याला संधी देण्यात आली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते.
अष्टपैलू- या सामन्यात भारतीय संघाने दोन अष्टपैलू खेळाडूंना अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे. रवींद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना फलंदाजीत योगदान देईल. मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर हा या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
वेगवान गोलंदाज- या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाची सर्वात जमेची बाजू वेगवान गोलंदाजी आक्रमण ठरणार आहे. या या वेगवान माऱ्याचे नेतृत्व मोहम्मद शमी करेल. अनुभवी उमेश यादव व मोहम्मद सिराज हे त्याला साथ देताना दिसतील.
या चौघांना बसावे लागले बाकावर
इंग्लंडमधील परिस्थिती वेगवान गोलंदाजीला उपयुक्त असल्याने प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला बाकावर बसावे लागले. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळाली. तर, पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला युवा यष्टीरक्षक ईशान किशन याला देखील भरत याच्यापुढे जाता आले नाही. फिरकी गोलंदाज अष्टपैलू अक्षर पटेल व डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत हे देखील या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये जागा बनवू शकले नाहीत.
(Team India Playing XI In WTC Final Against Australia Ashwin On Bench)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने ताज्या केल्या रोहित सोबतच्या जुन्या आठवणी, म्हणाला, “त्याला पहिल्यांदा पाहिले आणि…”
WTC FINAL| नाण्याचे नशिब रोहितच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण, अशी आहे प्लेईंग इलेव्हन