भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) यांच्यादरम्यान रविवारपासून (६ फेब्रुवारी) मर्यादित षटकांच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथे सर्वप्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. मात्र, आता ही बहुप्रतीक्षित मालिका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.
भारतीय संघात सापडले कोरोनाबाधित खेळाडू
भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि राखीव खेळाडू नवदीप सैनी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, मसाजीस्ट राजकुमार व अन्य एक सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असून या सर्वांना विलगीकरण ठेवण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध या कारणास्तव बीसीसीआयने सलामीवीर मयंक अगरवालला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा जोडीदार म्हणून मयंक डावाची सुरुवात करताना दिसेल अशी अपेक्षा आहे.
सराव सत्र झाले रद्द
सध्या भारतीय संघाचे सर्व खेळाडू अहमदाबाद येथे जमा झाले आहेत. भारतीय संघाचे पहिले सराव सत्र गुरुवारी (३ फेब्रुवारी) आयोजित केले जाणार होते. मात्र, संघातील ही परिस्थिती पाहता हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील एका दिवसात आणखी काही खेळाडू कोरोनाबाधित आढळल्यास सदर वनडे मालिका पुढे ढकलण्यात येऊ शकते.
असा आहे प्रस्तावित दौरा
वनडे मालिका अहमदाबादमध्ये ६ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. जिथे प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. त्याचवेळी, १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान कोलकातामध्ये टी२० मालिका खेळवली जाईल. टी२० मालिकेतील सामने पहायला येण्यासाठी मैदान क्षमतेच्या ७५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ सात भारतीयांवर मेगा लिलावात बसू शकतो ‘अनसोल्ड’ शिक्का (mahasports.in)