क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल काय लागेल, हे सांगता येत नाही. अनेकदा एका संघाचा फलंदाज शानदार फटकेबाजी करतो, पण तरीही त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता येत नाही. असेच काहीसे भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल याच्याबाबतीत घडले आहे. शुबमनने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या सुपर- 4 सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना शतक ठोकले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. यामुळे तो खूपच निराश झाला आहे. शुबमनच्या मते, जर त्याने घाई केली नसती आणि खेळपट्टीवर टिकून राहिला असता, तर भारतीय संघाचा विजय मिळवून दिला असता.
शुबमनची खेळी
शुबमन गिल (Shubman Gill) याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 133 चेंडूत 121 धावांची झंझावाती शतकी खेळी साकारली. या खेळीत 5 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. एका बाजून विकेट्स पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूला शुबमन टिच्चून फलंदाजी करत होता. त्याने एकट्याच्या जोरावर भारतीय संघाचा डाव पुढे नेला. तो जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत संघाच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र, 44व्या षटकात एक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला.
‘मी जास्त आक्रमकरीत्या खेळायला नव्हते पाहिजे’
भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर शुबमन गिल खूपच निराश झाला आहे. त्याने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, “ज्यावेळी मी बाद झालो, तेव्हा तो सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. मी परिस्थितीचे आकलन करण्यात चुकलो. जर मी सामान्य पद्धतीने फलंदाजी केली असती आणि तितक्या आक्रमक अंदाजात खेळलो नसतो, तर आम्ही हा सामना जिंकलो असतो. मात्र, या सर्व गोष्टींमधून शिकायला मिळते. अनेकदा तुम्ही परिस्थिती योग्यरीत्या समजू शकत नाहीत आणि माझ्याकडूनही तीच चूक झाली. मला यातून धडा घ्यावा लागेल. हा आमच्यासाठी अंतिम सामना नव्हता आणि आम्हाला यातून शिकावे लागेल.”
खरं तर, बांगलादेशने या सामन्यात भारतीय संघाचा 6 धावांनी दारुण पराभव केला. बांगलादेशच्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.5 षटकात 259 धावांवरच सर्वबाद झाला. आता भारतीय संघाला रविवारी (दि. 17 सप्टेंबर) गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध भिडायचे आहे. (team india prince shubman gill admits his fault after loss vs bangladesh in asia cup 2023)
हेही वाचा-
भन्नाट, जबरदस्त! 2023 मध्ये ‘असा’ विक्रम फक्त टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ गिललाच जमला, नजर टाकाच
पदार्पणवीराने दोनच चेंडूत केला रोहितचा खेळ खल्लास; सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही माझी Dream Wicket…’