न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांची मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूंच्या भविष्याविषयी निर्णय घेतले जाणार आहेत. भारतीय संघाला या महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असेल. बैठकीसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहादेखील उपस्थित असणार आहेत
भारताला आगमी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. याची सुरुवात २६ डिसेंबरपासून होईल. माध्यमातील वृत्तानुसार, बैठकीत महत्वाचा मुद्दा विराटच्या वनडे कर्णधारपदाबाबत असणार आहे. विराटने टी२० संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहितने ती जबाबदारी स्वीकारली. आता २०२३ मध्ये वनडे विश्वचषक खेळला जाणार असून, त्याआधी विराटकडून वनडे संघाचे नेतृत्व काढून रोहितकडे सोपविले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी याबाबत माहिती देताना संगितले की, “यावर्षी तसे जास्त वनडे सामने नाहीत. मात्र, रोहित शर्माला २०२३ विश्वचषकापूर्वी संघ तयार करण्याची संधी मिळाली पाहिजे. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय कधी घेतला जाईल, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.”
बैठकीत रहाणे आणि पुजाराच्या भविष्याचा देखील निर्णय घेतला जाणार आहे. वृत्तानुसार अजिंक्य रहाणेचे कसोटी उपकर्णधारपद काढून घेतले जाणे नक्की आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा ही जबाबदारी स्वीकारू शकतो. तसेच अजिंक्यला दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर निवडले जाऊ शकते, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची खूपच कमी शक्यता आहे.
चेतेश्वर पुजारा देखील मागच्या बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून, त्याने शेवटचे शतक केलेल्या गोष्टीला खूप दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांनी पुजारासाठी पर्याची खेळाडूचा शोध सुरू केला आहे. त्याची जागा घेण्यासाठी प्रियांक पांचाल आणि अभिमन्यु ईश्वरन हे प्रमुख दावेदार आहेत. तसेच मयंक अगरवालदेखील त्याच्या जागी खेळण्यासाठी दावेदार आहे.
दिग्गज वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने सतत चाहत्यांची निराशा केली आहे. तो इंग्लंड दौऱ्यापासून खूपच खराब फॉर्ममध्ये दिसतोय. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली गेली आहे आणि भविष्यात देखील सिराज त्याची जागा घेईल असे सांगितले जात आहे. त्याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी शिखर धवन संधी दिली जाण्याची देखील शक्यता सांगितली गेली आहे. अशात दक्षिण अफ्रिका दोऱ्यात निवडकर्ते काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखे असणार आहे.