भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी निर्णायक वळणावर आलेली दिसून येत आहे. भारतीय संघाला विजयासाठी केवळ 145 धावांचे आव्हान मिळाले असताना, बांगलादेशने भारताचे पहिले चार फलंदाज केवळ 45 धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय संघासमोर विजयी लक्ष पार करण्याचे आव्हान असेल. मात्र, भारतीय संघाची मागील सात वर्षातील आकडेवारी पाहिल्यास भारतासाठी हे आव्हान सोपे असणार नाही.
ढाका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ सामन्यात आघाडीवर होता. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशचा दुसरा डाव केवळ 231 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान राहिले. मात्र, त्यानंतर भारतीय डावाची अनपेक्षित घसरण झाली. कर्णधार केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारावर विराट कोहली हे भारताचे चारही प्रमुख फलंदाज 45 धावांवर तंबूत परतले. अशा परिस्थितीत विजयासाठी आणखी 100 धावा बनवण्याची जबाबदारी प्रामुख्याने रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांच्यावर असेल.
भारतीय संघासमोर हे लक्ष सोपे वाटत असले तरी, कसोटी क्रिकेटमधील मागील सात वर्षाचा इतिहास काढल्यास भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना अपयशीच ठरलेला दिसून येतो. 2015 पासून भारतीय संघाला कसोटीत 140 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना तब्बल 9 पराभवांचा सामना करावा लागला आहे. तर चार सामने अनिर्णित राहिले आहेत. यामध्ये केवळ एकाच सामन्यात भारतीय संघ विजयी होऊ शकला आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबा कसोटीत भारताने 329 धावांचा यशस्वी पाठलाग केलेला.
त्यामुळे ढाका कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विजय मिळवणार की बांगलादेश भारतावर मात करत मालिकेत बरोबरी साधणार हे पाहणे रंजक ठरेल.
(Team India Stats In Chasing Target In Test Cricket Is Hilarious)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धही थंडच राहिली राहुलची बॅट; दोन्ही सामन्यात ठरला फुल फ्लॉप
सीएसके आणि मुंबईच्या गोटात भीतीचे वातावरण! आगामी हंगामात संघचे प्रदर्शन सुधारणे गरजेचे