आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या वेळी या स्पर्धेतील सर्व सामने यूएईमध्ये (संयुक्त अरब अमिरात) खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ (Team india) आपल्या स्पर्धेला सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार असून, पहिल्या सामन्यात त्यांचा सामना यजमान यूएईशी होणार आहे. टीम इंडिया सध्या आशिया कपची विजेती आहे. 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत हा किताब जिंकला होता. आता संघाचं लक्ष हा किताब पुन्हा जिंकण्यावर केंद्रित आहे.
स्पर्धेच्या आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे. टी-20 मधील भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू आता फिट झाला आहे.
भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) काही महिन्यांपूर्वी त्याने इंग्लंडमध्ये स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. आता सूर्या पूर्णपणे दुखापतीतून बरा झाला आहे. तो सध्या बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये आपली फिटनेस ट्रेनिंग करत आहे. आशिया कप 2025 सुरू होण्याआधीच तो पूर्णपणे फिट झाला आहे आणि ही भारतासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
सूर्या सध्या भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने उत्तम कामगिरी केली आहे.
सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतासाठी अनेक सामन्यांत विजयी खेळी केल्या आहेत. आत्तापर्यंत त्याने 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने 38.20 च्या सरासरीने 2598 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने या फॉरमॅटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.






